पत्रकारिता व्यवसायिक होतेय
- Get link
- X
- Other Apps
पूर्वी गावामध्ये एक दोघांकडेच टिव्ही असायचा. ठराविक वेळेत लागणारे कार्यक्रम पाहण्यासाठी त्या घरांकडे लोकांची विशेषतः बच्चेकंपनीची गर्दी व्हायची. निरनिराळे कार्यक्रम पाहण्यासाठी विशिष्ट वयोगटातील व्यक्ती त्या ठिकाणी यायच्या व तो कार्यक्रम आटोपल्यावर आपापल्या कामाला निघुन जायच्या. बातम्यांसाठीदेखील दूरदर्शनवर एक ठराविक वेळ असायचा ज्यावेळेस गावातील जेष्ठ, जाणकार लोक थोडया वेळेकरीता एकत्र जमायची. मात्र आता बातम्यांचे स्वरुप २४ तासांचे मानवी आयुष्य ब्रेक करणारे झालेय. एखादया ठिकाणी एखादी घटना घडली काही क्षणांत ती विविध न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचते. मोठया घटनेच्या ठिकाणी सर्वच चॅनल्सवाले ताबडतोब पोहचत असल्याने बातमीची सत्यता समोर येण्याअगोदरच तिचा उहापोह सुरु होतो. चर्चा, तर्कवितर्कांना अगदी उत येतो. टिआरपी वाढवण्याच्या नादात अनेक चॅनल्सवाले उतावळेपणा करत बातमीला अतिरंजित करण्याचा प्रयत्न करतात. यातुन अनेकदा चुकीचे, संदर्भीहीन, गैरसमज पसरवणारे संदेश दर्शकांपर्यंत पोहोचतात व कित्येकदा समाजात तेढ निर्माण करतात. आजकाल चॅनल्समध्ये सुरु झालेली ही स्पर्धा सामाजिक वातावरण दुषीत करणारी असुन यावर कुठेतरी नियंत्रण आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सोशल माध्यमांवर सोयीस्कररित्या पसरवल्या जाणा-या चुकीच्या संदेशांवर अंकुश ठेवण्याचे काम वृत्तवाहिन्यांनी करणे आवश्यक असताना आज हया वृत्तवाहिन्यादेखील आपल्या सोयीप्रमाणे बातम्यांचे स्वरुप बदलताना दिसतात. यामुळे लोकशाहीचा हा स्तंभ ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. शासन, प्रशाासन व सत्ताधा-यांवर अंकुश ठेवण्याचे काम वृत्तवाहिन्यांकडून अपेक्षित आहे. लोकाभिमुख कामांसाठी पुढाकार घेताना अनैतिक, अनधिकृत कामांना पायबंद घालण्याची भुमिका वृत्तवाहिन्यांची असायला हवी. मात्र प्रसिध्दी व चढाओढीच्या नादात मुळ उददेशिकेकडे वृत्तवाहिन्यांचे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्त्या प्रकरणातील वृत्तांकनातुन ही बाब प्रकर्षाने दिसुन आली. नक्की कोणत्या हेतुने वार्तांकन केले जातेय हेच आजकाल कळेनासे झाले आहे. महिला अत्त्याचाराच्या घटना देशाच्या विविध भागांत सातत्याने घडत असताना व न्यायाच्या उददेशाने लोकभावना शासनासमोर पोहचवणे गरजेचे असताना नको त्या रंजक विषयांकडे बातम्यांचा अधिक ओघ असल्याचे दिसुन येत आहे. २४ तास सुरु असलेला हा बातम्यांचा रतिब खरोखरच आवश्यक आहे का याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आज भासत आहे. समाजात घडणा-या चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणण्याऐवजी नकारात्मक बातम्यांकडे अधिक कल असल्याचे दिसुन येते. प्रसारमाध्यम हे जनजागृतीचे उत्तम साधन आहे. लोकांना सामाजिक, आरोग्य, क्रिडा, वैज्ञानिकदृष्टया सुसंस्कृत बनवणे ही काळाची गरज आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांशिवाय इतर कुणी चांगली भूमिका वठवू शकत नाही. मात्र आजकाल पत्रकारितेमध्ये 'व्यावसायिक' बदल घडल्याने सामाजिक उददेश नष्ट होऊ पाहत आहे. त्याच त्याच बातम्यांमध्ये लोकांचा वेळदेखील खर्ची होत आहे. यामुळेच क्षणाक्षणाचे वार्तांकन करणा-या उताविळ वृत्तवाहिन्यांपेक्षा छापील वृत्तपत्रांची विश्वासार्हता आज वाढीस लागली आहे. यासाठी बातम्यांची एक ठराविक वेळ वृत्तवाहिन्यांना घालुन दिली पाहिजे. त्या वेळेत त्यांनी आपले आपले दैनंदिन वार्तापत्र प्रसारीत करावे. इतर वेळेत सामाजिक उपक्रम, सरकारी योजना लोकांपर्यंत पाहोचवणे, विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रसारीत करणे इत्यादी कार्यक्रमांचे प्रसारण करावे. ब्रेकींग न्यूज व सबसे पहलेचा हा खेळ कुठेतरी प्रतिबंधित केलाच पाहिजे. चॅनल्सचा अजेंडा राबविण्याच्या अटटाहासापायी वार्ताहर व पत्रकारांचे असुरक्षित बनत चाललेले जीवन सन्मानाजनक करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. पत्रकारीता पुन्हा स्वच्छ व समृध्द होणे लोकशाहीची गरज आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment