मदतीला धावून येणारी धाडसी मावसबहिण - ज्योत्स्नाताई
शनिवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी एक अत्यंत धक्कादायक बातमी कानावर पडली. ठाण्यात वास्तव्यास असलेली माझी मावसबहिण ज्योत्स्नाताई हीचे अल्पशा आजाराने अवकाळी निधन. बातमी एकताच मी पुरता हादरून गेलो. क्षणभर विश्वासच बसेना म्हणून ठाण्यातील माझ्या भावोजींना विचारणा करण्यासाठी फोन केला. बातमी खरी असल्याचे कळल्यावर डोक्यात ज्योत्स्ना ताईचा चेहरा व अनेक प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले. अत्यंत मनमिळावू, धाडसी, सर्वांना मदत करणारी ज्योत्स्ना ताई अशी अवकाळी आपल्यातून निघून जाईल असे तिच्या ठणठणीत प्रकृतीमुळे अजूनही खरे वाटत नाही. कौटुंबिक जिव्हाळ्यात वावरणाऱ्या ज्योत्स्नाताईने कठीण प्रसंगात अनेकांना आधार दिल्याचे लहानपणी मी अनुभवले आहे. मधल्या काळात तिच्याशी संपर्क होत नसला तरी तिच्या आठवणी मनात कायमच्या घर करून आहेत. अशीच एक माझ्या लहानपणीची घटना. तेव्हा मी माझ्या पालघर जिल्ह्यातील देवघर या गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकत होतो. परीक्षा आटोपल्यावर शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे रोज गावातील मित्रांबरोबर हिंडणे, फिरणे, खेळणे हाच दिनक्रम ठरलेला होता. आमच्या शाळेसमोरच्या मैदानावर एक भलेमोठे चिंचेचे झाड होते जे आजही तिथे अस्तित्वात आहे. या चिंचेवरील चिंचा पाडण्यासाठी मुलांची मोठी गर्दी त्या ठिकाणी व्हायची. त्या दिवशी दुपारी आम्ही शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होतो. खेळता खेळता चिंचा पाडण्याच्या मोहातून चिंचेखाली आलो. अनेक मुले तिथे दगड, काठी, विटा फेकून चिंचा पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यातूनच एक टोकदार काठी चिंचेवरील फांदीला अडकली होती. मी चिंचेखाली जाताच कसल्यातरी धक्क्याने ती काठी थेट खाली आली. भल्यामोठ्या उंच अशा त्या झाडाच्या फांदीची उंची जमिनीपासून साठ सत्तर फूट उंच असल्याने खाली पडलेली टोकदार काठी प्रचंड वेगाने खाली येऊन थेट माझ्या उजव्या पायावर पडली. उजव्या पायात घुसलेली काठी जिला आम्ही गावाकडच्या भाषेत चिंब (बांबूच्या झाडापासून तयार केलेल्या बारीक काठ्या) म्हणतो ती इतकी खोलवर घुसली होती की पायातील नसा व हाडांना देखील इजा होऊन प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला होता. आजूबाजूच्या मित्रांना देखील त्या क्षणी काय करावे सुचत नव्हते. रक्तस्रावामुळे माझी अवस्था अत्यंत भेदरल्यासारखी झाली व वेदनेने विव्हळत खाली पडलो. त्याच वेळी गावापासून पाच किलोमीटर दूरवरच्या चिंचघर या गावात महाविद्यालयीन शिक्षण घेणारी व माझ्या देवघर या गावातच राहणारी माझी मावसबहीण ज्योत्स्नाताई तेथूनच नेहमीप्रमाणे त्या शाळेच्या मैदानावरून घरी जात होती. तिला हा प्रकार समजला व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तिने तातडीने माझ्याकडे धाव घेतली. रक्तस्त्राव व वेदनांमुळे विव्हळणारा मी खाली कोसळून बराच वेळ बसूनच राहिलो होतो. तिने आपल्या ओढणीने व रुमालाने माझ्या रक्तस्त्राव होत असलेल्या पायाला तळव्यापासून घट्ट बांधले जेणेकरून रक्तस्त्राव थोडा कमी होईल. नंतर तिने मला लगेचच उचलून अगोदर घरी आणले व आईला आवाज देत नुकत्याच गावात आलेल्या एसटी बसला हात देत मला नाक्यावरील दवाखान्यात नेण्याची तयारी सुरू केली. आई व घरची इतर मंडळींदेखील माझ्या त्या अवस्थेमुळे गर्भगळीत झाली होती व त्यांना काहीच सुचत नव्हते. मात्र ज्योत्स्नाताईने त्या कठीण घडीला प्रसंगावधान दाखवत आईला सोबत घेत अखेर मला नाक्यावरील डॉ पाटील यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉ पाटील यांनी तातडीने उपचार सुरू करत आधी रक्तस्त्राव थांबवला. नसा कापल्या गेल्याने व जखम खोलवर असल्याने अकरा टाके पायाला घातले. दहा दिवस दवाखान्यातच पडून होतो, नंतर पुढचे दोन महिने ड्रेसिंगसाठी जावे लागायचे. नंतर कालांतराने ती पायावरील जखम भरली असली तरी आजही त्या जखमेची पायावरील दिसणारी खूण मला त्या प्रसंगाची व माझ्या धाडसी मावसबहिणीची आठवण करून देते. आज तिची आमच्यात नसण्याची जाणीव व पायावरील 'ती' खूण ताईच्या ह्या आठवणीने अत्यंत व्याकुळ करून गेली.
Comments
Post a Comment