नवी मुंबईकरांचा अंत पाहू नये
*नवी मुंबईकरांचा अंत पाहू नये*
मध्य, पश्चिम मार्गांबरोबरच नवी मुंबईदेखील प्रचंड प्रमाणात विस्तारत गेलेली असून या नगरीत कामधंद्यानिमित्त येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांमध्येदेखील भरमसाठ वाढ झालेली आहे. असे असताना हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गाला म्हणाव्या तितक्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाकडून महत्व व न्याय दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रवाशी संख्या वाढूनही मर्यादित लोकलफेऱ्या, जुन्या व वापर झालेल्या रेल्वेगाड्या, मर्यादित तिकीट खिडक्या, प्रशस्त स्थानके असली तरी सुविधांची वानवा तसेच सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तीनही मार्गांवर पुरेश्या विशेष गाड्या चालवल्या जात असताना ट्रान्स हार्बर मात्र मोठ्या प्रवाशीसंख्येचा असूनदेखील गेले पाच सहा महिने बंद असल्याचा जमा आहे. इतका अन्याय होत असला तरी नवी मुंबईतील जनता फार सोशिक आहे. अन्याय होत असल्याचे समोर दिसत असले तरी त्यासाठी प्रशासनास त्रास देणारे मोठे आंदोलन वा संघर्ष कधी झाल्याचे कधी दिसून आलेले नाही. त्यामुळे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता नवी मुंबईकरांचा अधिक अंत पाहू नये आणि लोकलफेऱ्या तसेच सुविधांमध्ये वाढ करावी.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment