मानसिक आरोग्य दिन
- Get link
- X
- Other Apps
१० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य दिन साजरा होत आहे. मानसिक आरोग्याचे महत्व आपणा सर्वांना विदीतच आहे. शारीरीक स्वास्थ्य हे ब-याच अंशी मानसिक स्वास्थ्यावर अवलंबुन असते. मनाने व्यक्ती सुदृढ असेल तर कोणत्याही गंभीर आजारावर मात करण्यासाठी त्याच्या शरीरात पर्याप्त उर्जा आपोआपच निर्माण होत असते. त्यामुळे मानसिक स्वास्थ अबाधित राखणे तितकेच महत्वपूर्ण आहे. विशेषतः सध्याच्या कोविड साथीमध्ये रुग्ण मानसिक दृष्टया खचल्याने व घाबरल्याने मृत्यू पावल्याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे शारीरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याला दुर्लक्षित करुन चालणार नाही. कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तींपैकी बहुतांशी व्यक्ती हया कोणतेही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या आढळुन येत आहेत. या रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यांची गणना कोरोना रुग्णामंध्ये होत आहे. सामान्यतः बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये भरती केले जाते. आणि सदर व्यक्ती संशयीत रुग्ण म्हणून ओळखल्या जातात. लक्षणे नसतील तर या व्यक्तींना घरीच अलग राहण्याचा सूचना दिल्या जातात. अशा संशयित व्यक्तींचे नमुने कोविड चाचण्यांसाठी घेतले जातात किंवा अनेक जण स्वतःहून खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करुन घेत आहेत. त्यात कोविडचे कोणतेही लक्षण दिसत नसतानादेखील अहवाल पॉझीटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. वास्ताविकतः, सर्वसामान्यपणे दैनंदिन जिवन व्यतीत करत असताना अचानकपणे कोविड अहवाल पॉझीटिव्ह आल्याने सदर व्यक्ती व व्यक्तीच्या संपर्कातील इतर कुटुंबिय संभ्रमावस्थेत येतात व घाबरतात. त्यामुळे पुढे रुग्णालय शोधणे, दाखल करणे या बाबींसाठी धावाधाव सुरु होते. अनेकजण तर या धावाधावीमध्ये बेजार होऊन जातात कारण आज बहुतांश रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने दाखल करुन न घेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने होणा-या चाचण्या पाहता व सुरळीत होत चाललेले जनजीवन पाहता यापुढील काळात रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून शासनामार्फत लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरीच अलगीकरणाची आवश्यक व्यवस्था उपलब्ध असेल तर रुग्णालयामध्ये दाखल न करता घरीच विलगीकरणाचा (Home Isolation) चा पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. यासाठी लागू केलेल्या पात्रतांची पूर्तता सदर कोविड पॉझीटिव्ह व्यक्तीने केल्यास काळजीवाहू व्यक्तीसह त्याला घरीच उपचार घेता येतील. नमुना घेतल्यापासुन १७ दिवसांपर्यंत सदर व्यक्तीला कोविडचे कोणतेही लक्षण दिसत नसल्यास ती व्यक्ती गृह विलगीकरणातुन मुक्त होईल व पुन्हा चाचणी करण्याचीदेखील आवश्यकता भासणार नाही. यामुळे एकतर रुग्णालयांवरील अनावश्यक भार कमी होईल, रुग्णांनादेखील घरीच विलग राहावे लागणार असल्याने दिलासा मिळेल व मुख्य म्हणजे अनावश्यक कोविड चाचण्यांचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होईल. मात्र सामाजिक मानसिकता या दृष्टीने प्रबळ करणे आवश्यक असुन त्यासाठी मोठया जनजागृतीची गरज आहे. आज कोविड पॉझीटिव्ह व्यक्तीच्या बाबतीत समाजात निर्माण होत चाललेली दुषित मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. कोविड हा एक आजार आहे व तो उपचाराने पूर्णपणे बरा होतो हे सर्वप्रथम सर्वांनी मनी रुजवले पाहिजे. त्यामुळे कोविडवर मात करणा-यांना योध्दे संबोधले जातात. अशा व्यक्तींचा ठिकठिकाणी उचित सन्मानदेखील होत आहे हे खरे तर चांगले चित्र आहे. मात्र राज्याच्या काही भागांत अजूनही कोविड बाधित व्यक्तींना सापत्न वागणूक दिली जाते, जे नक्कीच उचित नसुन अज्ञानाचे प्रतिक आहे. या आजाराबाबत असलेले गैरसमज व चुकीची माहिती लोकांच्या मनातुन काढून टाकण्याचे मोठे आव्हान आज सरकारी यंत्रणांसमोर आहे. कोविड आजाराचा उकल करुन या आजारावर प्रतिबंधात्मक औषध लवकरच उपलब्ध होईल मात्र आज वाढत चाललेली रुग्णसंख्या थोपवून लोकांची भिती कमी करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साखळीत ओढल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे मुख्य उदिदष्ट आज आरोग्य व्यवस्थेसमोर आहे. शासकीय यंत्रणा यासाठी अहोरात्र झटत असुन प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. पॉझीटिव्ह व्यक्तींनीदेखील या आजाराची भिती न बाळगता जोमाने त्याचा मुकाबला करायला हवा, नियमित औषधोपचार व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा व्यक्तींना सामाजिक आधार देण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. मानसिक बळच रुग्णाचे मनोबल व आरोग्य सुधारण्यास कारणीभुत ठरणारे सर्वात मोठे औषध आहे. त्यामुळे आपली व कुटुंबाची काळजी घेतलीच पाहिजे मात्र आपल्या आजुबाजुचे शेजारी, मित्रमंडळी किंवा नातलगांना याची लागण झाल्यास त्यांना असलेली भौतिक आधारापेक्षा मानसिक आधाराची खरी गरज ओळखुन धीर देण्याचा प्रयत्न करायला हवा. आज ना उदया आपण या भिषण संकटातुन नक्कीच बाहेर पडू मात्र दुरावलेली नाती व मने पुन्हा एकत्र येणे फार अवघड आहे ही गोष्ट ध्यानात असु दया. त्यामुळे कोविड प्रतिबंधासाठी सुरु असलेला हा लढा कोविडचे उच्चाटन होऊन काही दिवसांनी यशस्वीपणे संपणारच आहे मात्र यातुन एकमेकांशी असलेले ऋणानुबंध टिकवायला हवेत. ते लोप न पावता कसे दृढ होतील यासाठी प्रयत्न केल्यास सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्यदेखील टिकुन राहील. तेव्हा काळजी घ्या, सुरक्षित राहा व एकमेकांना दूर न लोटता मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment