अर्ध्या कोयत्याचे आरोग्य
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
अर्ध्या कोयत्याचे आरोग्य हा लेख (लोकसत्ता ११ नोव्हेंबर) वाचला. मकाम ने केलेल्या सर्वेक्षणात ऊसतोड महिला कामगारांच्या आयुष्याची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे. दिवाळीनंतर कामावर परतणाऱ्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहेत. मुळात या कामगारांची रोजंदारी व पिळवणूक हे प्रश्न सुरुवातीपासूनच आ वासून उभे आहेत. त्यात महिला कामगारांच्या आरोग्य व मुख्यत्वे मासिक पाळी, गरोदरपणातील प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायलाच हवे. बहुतांश महिला या आजारपण व प्रसूतीत घरीच उपचार घेतात, सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. ४० वर्षांच्या आतील महिलांचे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण तर धक्कादायकच आहे. या महिलांची कुटुंबात व कामाच्या ठिकाणी होणारी शारीरिक झीज प्रामुख्याने त्यांच्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. त्यात अस्वच्छता व निष्काळजीपणा ह्या गोष्टी आहेतच. सरकारने स्थापन केलेल्या स्व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कामगार व प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांकडे गँभिरतापूर्वक पाहण्याची आवश्यकता असून त्यांच्यासाठी दीर्घकालीन व ठोस सरकारी धोरण आखण्याची आवश्यकता आहे. यासोबतच आरोग्य शिक्षण व सरकारी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न लाभदायक ठरतील. मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख समस्या असलेल्या या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचे काम मकाम मधील महाराष्ट्र नेटवर्कच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले काम नक्कीच दखलपात्र आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment