जप्तीच्या मालातून समाजोपयोगी कामे करा
जप्त केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट कशी लावली जाते याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड संभ्रमावस्था आहे. सोने, चांदी, दारू, चंदन, चरस, गांजा, वाहने, रोख रक्कम व इतर महागड्या वस्तू चोरट्यांकडून जप्त केल्या जातात व सरकारी तिजोरीत जमा केल्या जातात. अपवादात्मक परिस्थितीत यातील काही वस्तू ओळख पटवण्याचे व कायद्यानुसार सर्व सोपस्कार पार पडल्यावर मूळ मालकांना परतदेखील मिळतात. मात्र बहुतांश प्रकरणात या मुद्देमालाचे मोल व त्याची विल्हेवाट याबाबतचे गूढ कायम आहे. यासाठी या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, लोकाभिमुखता व सुसूत्रता आणली पाहिजे. या मुद्देमालाच्या विक्रीतून जमा होणाऱ्या निधीचा विनियोग गोरगरिबांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांमध्ये करायला हवा तसेच कोविड सारख्या साथीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य तरतुदींवर त्याचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारच्या जप्तीनंमधून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल मिळत असल्याने त्याचा विनियोग समाजोपयोगी व विधायक कामांसाठी केल्यास त्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment