मुंबईकरांची यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी
- Get link
- X
- Other Apps
दरवर्षी दिवाळीत मुंबईमध्ये फुटणा-या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. मात्र यंदा मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे. कोरोनाचे संकट व फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाने उदभवणारे आजार पाहता यंदा फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुंबईकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत फटाक्यांवर निर्बंध आणत ख-या अर्थाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. यासंदर्भात सर्व्हेक्षण करणा-या आवाज फाऊंडेशनने फटाक्यांच्या आवाजाची आकडेवारी समोर आणली आहे. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके फोडले जातात. मात्र सन २००३ नंतर लक्ष्मी पूजनच्या दिवशी सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईकरांनी या दिवाळीला दाखवलेलं सकारात्मक चित्र कोरोना संक्रमण काळासाठी अनुकूल असुन या प्रदुषणामुळे उदभवणा-या आजारांवर नक्कीच नियंत्रण येऊ शकेल. दिवाळीसारखा सणदेखील नागरीकांनी अत्यंत साधेपणाने व कौटुंबिक पातळीवरच साजरा केल्याने संभाव्य आजारांची शक्यतादेखील कमी होणार आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सरकारी आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातदेखील दाखवलेला संयम कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात नक्कीच लाभदायक ठरणार आहे. अनेक ठिकाणी तर फटाके वाजतच नव्हते तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात फटाके वाजत असल्याचे चित्र होते. त्यामुळे मुंबईकरांनी ख-या अर्थाने इको फ्रेंडली दिवाळी साजरी केली असेच म्हणावे लागेल. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी फटाके बंदीचा निर्णय आणि त्यासोबतच कमीत कमी फटाके वाजवून प्रदूषण कमी व्हावे यासाठी केलेल्या प्रशासनाच्या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबईच्या वायू प्रदूषणाबाबत सफर संस्थेकडूनदेखील सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यांच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही सर्वसाधारण राहिली असून यावर्षी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा २०० पेक्षा कमी राहिल्याचे दिसुन आले आहे. दिल्ली, पुणे, अहमदाबाद या मोठ्या शहरांपेक्षा मुंबईतील वायू प्रदूषण हे दिवाळीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी कमी असल्याचे आकडेवारीमध्ये समोर आला. २०१८ साली व त्याआधीच्या वर्षांमध्ये मुंबईचा AQI हा २०० पेक्षा अधिक असायचा. त्यामुळे फटाके फोडण्याच्या बाबतीत एक प्रकारची जागरुकता लोकांमध्ये आली असुन एक सकारात्मक सामाजिक बदल होताना दिसुन येत आहे. फटाक्यांतुन प्रदुषण तर होतेच मात्र लोकांच्या पैशांचादेखील होणारा धुर पाहता आगामी काळात फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाचा आलेख उतरत जाईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment