हा नाला कधी स्वच्छ होणार?
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
घणसोली व कोपरखैरणे नोडला विभागणारा नाला ठाणे बेलापूर मार्गावरील शीळफाट्याकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सदर नाला पहिल्यापासूनच अत्यंत दुरावस्थेत असून या नाल्यात सदैव गाळ, कचरा, माती, शेवाळ यांचे साम्राज्य असते. घणसोली सेक्टर १ ते ४ मधील रहिवाशांना या नाल्याचा मोठा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. नाल्यातील घाणीचा उग्र वास व त्यातून निर्माण होणारे डास यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. पावसाळ्यात या नाल्याची थातूर मातूर साफसफाई करण्यात येते. मात्र नाल्यातील गाळ व कचरा कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे बाराही महिने या नाल्याची अवस्था अत्यंत वाईट असते. विविध भागातून सांडपाणी व केमिकलयुक्त पाण्यामुळे या नाल्यातून अनेकदा उग्र वास येतो. परिसरातील काही लोक या नाल्यात कचरादेखील टाकत असल्यामुळे त्यांच्यावरदेखील कारवाईची मागणी होत आहे. येथील नागरिकांना होणारा हा सततचा त्रास पाहता नाल्याच्या या दुरावस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नाल्याशेजारी सध्या बसण्यासाठी बाकडे व विविध झाडांनी सुशोभीकरण देखील करण्यात येत आहे. मात्र नाल्याच्या अस्वच्छतेमुळे इथे सतत डासांचा वावर असतो. त्यामुळे सायंकाळच्या वेळी इथे बसणे असह्य बनून जाते. या नाल्याजवळ शाळादेखील असून नाल्याजवळून शाळकरी मुले व जेष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते. घणसोली व कोपरखैरनेला जोडणारा हा नाला या ठिकाणावरून नेहमी ये जा करणाऱ्या दोन्ही नोडमधील लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. नवी मुंबईसारख्या स्वच्छतेच्या बाबतीत देशात उत्तुंग भरारी घेणाऱ्या शहराला नाल्याची ही दुरवस्था नक्कीच शोभनीय नाही. अशा प्रकारचे इतरही अनेक नाले नवी मुंबईतील विविध प्रभागांमध्ये अस्तित्वात आहेत. एकतर या नाल्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साफसफाई तरी करण्यात यावी किंवा नागरी वस्तीतून जाणारे हे नाले बंदिस्त करून त्यावर वाहनतळ उभारण्याचा पर्याय पडताळून पाहता येईल. नाल्यांची योग्य साफसफाई झाल्यास हे नाले शहराच्या सौंदर्यात भरच घालतील. तसेच नाले बंदिस्त केल्यानंतरदेखील उपलब्ध होणारी जागा महानगरपालिकेचा महसूल वाढवणारीच ठरणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने या नाल्यांच्या बाबतीत नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment