श्री रवींद्र शेळके, संचालक वित्त व लेखा यांच्या सेवानिवृत्ती निमित्त

आरोग्‍य विभागातील आणखी एक वरिष्‍ठ अधिकारी श्री. रविंद्र शेळके सर हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० नोव्‍हेंबर २०२० रोजी शासकीय सेवेतुन निवृत्‍त होत आहेत. त्‍या निमित्‍ताने कार्यालयीन कामकाजाचा अखेरचा दिवस म्‍हणून आज कार्यालयातील सहका-यांसह त्‍यांची सदिच्‍छा भेट घेतली. राज्‍य शासनाच्‍या वित्‍त विभागातील वरिष्‍ठ अधिकारी असलेले श्री. शेळके सर आरोग्‍य विभागात २०१६ म्‍हणजे गेल्‍या चार वर्षांपासुन संचालक (वित्‍त व लेखा) या पदावर कार्यरत होते. गेल्‍या चार वर्षाच्‍या कारकिर्दीत त्‍यांनी आपल्‍या पदाला व वित्‍त विभागाला न्‍याय देत सन्‍मानजनक कामगिरी करुन दाखविली. आरोग्य खात्यात राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानासारख्‍या एका मोठया बजेटच्‍या कार्यक्रमासोबतच त्‍यांनी एडस नियंत्रण संस्‍था व आयुक्‍तालयातील लेखाविषयक किचकट कामकाजदेखील काही काळ यशस्‍वीरित्‍या सांभाळले. कोणत्‍याही विभागाच्‍या दृष्‍टीने आर्थिक बाब ही अत्यंत संवेदनशील व महत्वपूर्ण बाब असते. अशा विषयामध्ये अचूकता राखत शासन सेवा यशस्वीरीत्या पूर्ण करणे म्हणजे एक दिव्यच. ते पार करण्यात शेळके सरांना आलेले यशच त्यांची उपयुक्तता सिद्ध करते. १९८६ साली सेवेची सुरुवात करणाऱ्या शेळके सरांची वयाची तब्बल ३४ वर्षे शासकीय सेवा पार पडली. यात त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा, सातारा, रायगड, दोनदा सांगली या जिल्ह्यांच्या ठिकाणी कॅफोसारखे सर्वोच्च वित्तीय पद सांभाळले. त्यांनतर कोकण विभागात त्यांनी जिल्हा परिषदांचे लेखा परिक्षणाचे काम पाहिले. वयाची ५८ वर्षे उलटून आजदेखील त्यांची तल्लख बुद्धी व काम करण्याची उमेद हेवा वाटावी अशीच आहे. गेली चार वर्षे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या माझ्यासह सर्वच सहकाऱ्यांना  त्यांचेकडून मिळालेली वागणूक व मार्गदर्शन विसरता येणार नाही. वित्त व प्रशासकीय बारकाव्यांचे सखोल ज्ञान बाळगणाऱ्या शेळके सरांचा मोठा उपयोग अभियानाला झाला. सर्व कर्मचार्यांशी स्नेहाचे संबंध ठेवणारे मात्र कार्यालयीन शिस्तीच्या बाबतीत प्रचंड आग्रही असणारे शेळके साहेब एक तत्वनिष्ठ अधिकारी आहेत. कामानिमित्त येणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक न दुखावणारे व सर्वांशी सौहार्दाचे संबंध ठेवणारे शेळके सर नियमात न बसणाऱ्या गोष्टी समोरच्याला तितक्याच तिडकीने समजावून सांगतानादेखील दिसून आले. जवळपास तीन तपांचा शासकीय व तोदेखील वित्त खात्याचा अनुभव गाठीशी असलेल्या शेळके सरांचा निवृत्तीनंतरदेखील एखाद्या लोकसेवेशी निगडित जबाबदारीत गुंतून राहण्याचा मानस आहे. आज त्यांच्या दालनात त्यांच्या अधिनस्त असलेल्या वित्तीय व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचार्यांसोबत झालेल्या छोटेखानी औपचारिक निरोप समारंभात उपस्थित राहण्याचा योग आला. सवयीप्रमाणे त्यांना माझे आरोग्यमंथन हे पुस्तकदेखील भेट म्हणून दिले. त्याप्रसंगी त्यांनी सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करत सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे विषद केले. शेळके सरांना त्यांचे उर्वरित आयुष्य आरोग्यदायी, सेवाव्रती व सुख समाधानाचे जावो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त