कायद्याचा धाक हवाच
मुळात गेल्या काही वर्षांपासून पोलीस व त्यातल्या त्यात वाहतूक पोलीस काही भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांमुळे बदनाम ठरत आहेत. गुन्हेगार व वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने पोलिसांचा धाक कमी होऊ पाहत आहे. कायद्यातील पळवाटा व पैशाच्या जोरावर कायदा मोडला तरी कारवाईतुन मार्ग काढता येतो असा समज दृढ होत चाललेला आहे. त्यामुळे पोलिसांना येत्या काळात आपली सदरक्षणाय, खलनिग्रणाय ही ओळख जपण्यासाठी विभागांतर्गत शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. समाज व वाहतुकीमधील शिस्त व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकामी पोलिसांचा वाटा खूप मोलाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांप्रति आपली भूमिका व्यक्तिपरत्वे बदलता कामा नये. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांप्रति सौजन्याची भूमिका कामाची नसून त्यांचेवर कायद्याचा धाक ठेवलाच पाहिजे. पोलिसांची भीती गुन्हेगाराची प्रवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली तरच समाजातील छोट्यामोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment