भाषेचा सुसंस्कृतपणा गमावू नका
- Get link
- X
- Other Apps
आजकाल टेलिव्हीजनवरील ब-याच बातम्या व चर्चा मसालेदार विषयांनी भरलेल्या दिसतात. हवे तेव्हढे व खपेल तेच दाखवण्यामध्ये अनेक वृत्तवाहिन्या आघाडीवर दिसतात. राजकीय मंडळी व वृत्तनिवेदकदेखील मग तितक्याच पोटतिडकीने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात व भाषेवरील नियंत्रण गमावतात. ज्या पध्दतीने सध्याचे राजकारण प्रवास करत आहे ते जर बघितले तर त्यामध्ये भाषेची पातळी खालावत चालल्याचे मुख्यत्वे आपल्याला दिसुन येईल. सरकारी पक्ष असो विरोधी, दोन्ही बाजुंकडून भाषेचे तारतम्य पाळले जात नाही. काही वृत्तवाहिन्यादेखील अतिउत्साहाने करत असलेल्या करत असलेल्या वार्तांकनामध्ये भाषेचा संयम ढळताना दिसत आहे. यात काही राष्ट्रीय वाहीन्या आघाडीवर आहेत. वृत्तवाहिन्यांनी घटनेचा बारकाईने उहापोह करण्यात व चुकीची बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये गैर नाही. मात्र त्यामध्ये पुरावे व सौजन्यशील भाषेचा अंतर्भाव असावा. राजकारणातील भाषाप्रभुत्वाची अनेक उदाहरणे आजवर देशाने पाहिली. ज्यात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व दिवंगत प्रमोद महाजन यांचे व्याख्यान कौशल्य इतर कुणालाही साधता येऊ शकत नाही. संभाषणातुन भाषासंस्कृती हरवू न देता भाषासौंदर्याचा अप्रतिम मिलाप त्यांच्या बोलण्यातुन दिसून यायचा जो सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना भावनेच्या भरात भाषेची निच्चांक पातळी गाठली जात आहे. याचे पर्यावसान ब-याचदा सामाजिक तेढ व गैरसमज वाढण्यात आहे. कारण आजदेखील सर्वच राजकीय पक्षांना मार्गदर्शक मानणारा मोठा वर्ग समाजात आहे. आपल्या नेत्याच्या वर्तनाचे अनुकरण करत असताना त्याच्या शब्दांनादेखील उचलुन धरण्याचा प्रयत्न हा वर्ग करतो. त्यामुळे नेतेमंडळींनी जाहिरपणे केलेल्या वक्तव्यांचे पडसाद आपसुकच त्यांच्या समर्थकांमध्ये उमटतात व तेढ वाढत जाते. प्रसारमाध्यमांनीदेखील अशा भडक वक्तव्यांना अमाप प्रसिध्दी न देता सबुरीने घ्यायला हवे. आजकाल आपल्याला सोयीची वक्तव्ये व क्लीप दाखवण्याचा फंडा माध्यमांमध्ये रुजू होत आहे. यामुळे संभाषणाचा मुळ उददेश बाजूला राहून नको त्या विषयांचीच चर्चा अधिक प्रमाणात होते. खरेतर प्रसार माध्यमांची ही भूमिका सामाजिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे नेते मंडळींनी आपल्या वाणीवर ताबा ठेवून वक्तव्ये करायला पाहिजेत आणि त्याच जाणीवेने भडक व तेढ निर्माण करणारी वक्तव्ये माध्यमांनी टाळायला हवीत. महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. येथे नानाविध भाषेचे व संस्कृतीचे लोक वास करत आहेत. त्यामुळे राज्यातील जबाबदार नेते मंडळींनी व वृत्तवाहिन्यांनी आपापली भूमिका लोकांसमोर मांडताना भाषेचा सुसंस्कृतपणा गमावू देऊ नये.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment