वास्तववादी लेख

हळदीला जाताय ? हा लेख वास्तववादी असून आगरी, कोळी समाजाच्या जीवनमानावर प्रकाश टाकणारा आहे. आगरी कोळी लोकांची हळद म्हटली की समोर येतो तो मांसाहारी जेवणावळ्यांचा अस्सल आगरी साज. कोरोना काळात लग्न, साखरपुडे, हळदिं सारख्या कार्यक्रमांवर मर्यादा असली तरी सध्याचे दिवस हे लग्नकार्याचे दिवस आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समाजात लग्नांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे हळदी समारंभही पुन्हा एकदा जोमात सुरू झाले आहेत. आगरी जेवणाची लज्जत काही औरच. मीदेखील यापूर्वी अनेकदा या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. विदर्भात जसा सावजी प्रकार प्रसिद्ध आहे तसा आपल्याकडे आगरी लोकांच्या जेवणातील ठसकेदारपणा काही न्याराच आहे. त्यामुळे आगरी कोळी लोकांची लग्ने ज्या प्रमाणे त्यांच्या दिमाखदारपणासाठी ओळखली जातात त्यापेक्षा जास्त त्यांच्या जेवणाच्या चवीसाठी परिचित आहेत. पूर्वापार पासून शेती व्यवसाय करणारा हा घटक गावांचे रूपांतर शहरांत होऊ लागल्याने आपल्या चालीरितींमध्येदेखील बदल करू लागलाय. सिडकोने जमिनींचा विकास करताना त्यांच्या जमिनी मोबदल्यासह अधिग्रहित केल्या व त्यांच्या शेतांच्या जागी आता टोलेजंग इमारती दिसू लागल्या आहेत. त्यातून मिळालेल्या अर्थ गणितावर त्यांच्या राहणीमानातदेखील कालपरत्वे बदल घडत गेला. मधल्या काळात तर आगरी लोकांची लग्ने म्हणजे दारू, मटण यासाठीच ओळखली जायची. यामुळे राजकीय लोक अशा समारंभापासून काहीसे अलिप्त राहत असल्याचे जरी खरे असले तरी त्यावर बोलण्याचे धारिष्ट करताना कधी दिसले नाहीत. लेखात उल्लेख केलेला माजी मंत्री व ठाण्याचे माजी खासदार जगन्नाथ पाटील यांचा किस्सा नक्कीच प्रशंसनीय आहे. त्यांच्या घरातील हळदीसाठी दोनशे लोकांच्या शाकाहारी जेवणाची व्यवस्था असताना चाळीस पन्नास लोकच जेवले. ही वस्तुस्थिती आजही अनेक ठिकाणी दिसुन येते. हळदीसाठी मांसाहारिच बेत असावा हा प्रघात अनेक समाजात दृढ झालेला आहे. अगदी एका दिवशी एकापेक्षा अधिक हळदी असतील तर ज्या ठिकाणी मांसाहारी आहे तेथे अधिक लोक जेवत असल्याचे उदाहरांवरून सांगता येईल. त्यामुळे चवीचे चोचले पुरवणारे लोक कार्यक्रमाना देखील चवीप्रमाणे हजेरी लावतात. मात्र आता समाजिक मानसिकता बऱ्याच अंशी बदलु लागलीय. आपली जुनी ओळख टिकवून ठेवून लग्नातील अनावश्यक खर्च व रितींना फाटा देताना आज लोक दिसत आहेत. हा खरेतर चांगला संकेत आहे. मात्र आगरी समाजातील जेवणावळ्यांचा व हळदीच्या कार्यक्रमांचा यथेच्छ आस्वाद घेऊन त्याच समाजावर टीका करणारेदेखील असतील अशा लोकांची कीव करावीशी वाटते. एकंदरीत, लग्नासारख्या शुभकार्यात भपकेबाजपणाऐवजी साधेपणा व सुसंस्कृतपणा आणला तर जेवणाची व कार्याची चवदेखील चिरकाल जीभेवर टिकून राहील एव्हढे नक्की. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त