सिकलसेल जनजागृती सप्ताह- ११ ते १७ डिसेंबर २०२०


सिकल सेल अॅनिमिया
११ ते १७ डिसेंम्बर या कालावधीत सिकल सेल जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. सिकल सेल या आजाराविषयी आपल्‍यातल्‍या ब-याच जणांना पूर्ण माहिती नाही. आपण या आजाराविषयी जाहिराती, वर्तमानपत्र किंवा टिव्‍हीवर पाहीले, ऐकले असेल. खरेतर सिकल या शब्दाचा अर्थ विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. त्‍यामुळे या दोषाला सिकल सेल असे नाव आहे.  सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून येतो. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते. परिणामी रक्त कमी होते. याच अवस्थेला आपण ‘अ‍ॅनिमिया’ म्हणतो. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ असे नाव पडले. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे. या आजाराचे रुग्ण जगभर सापडतात. पण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि भारतात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. माता व पिता दोघेही सिकल सेल वाहक असतील तर त्यांच्या अपत्यांनाही हा आजार होऊ शकतो.त्यामुळे समाजातील सिकल सेल रुग्ण शोधून काढणे व त्यांनी आपापसांत विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  सिकलसेल आजाराच्या रुग्णांना वेळाेवेळी उपचार घ्यावा लागताे. शरीरातील हिमाेग्लाेबिनचे प्रमाण कमी हाेताच  व्यक्ती अनेक आजाराला बळी पडून मृत्यूमुखी पडतात. सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे हाेताे.  तसेच रक्तदाेषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत साेबत राहताे. सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळाेवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने ग्रस्त रुग्ण वारंवार आजारी पडताे. राज्यात ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताह पाळला जात आहे. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दाेन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गाेल असताे. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा हाेताे. सिकलसेल वाहक-पीडित व्यक्तीने एकमेकांशी विवाह करू नये. गडचिराेली जिल्ह्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अन्य समाजातील एकूण ३२  हजार २९४ सिकलसेल वाहक तर याच समाजातील २ हजार ५११ सिकलसेल ग्रस्त असे एकूण ३४ हजार ८०५ सिकलसेल रुग्ण आहेत. विदर्भात दीड लाखांवर रुग्ण तर राज्यातील ३६  जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यात अडीच लाखांवर सिकलसेल रुग्ण आहेत. विदर्भातील ११ जिल्हे सिकलसेलने अधिक प्रभावित आहेत. दीड लाखांवर अधिक रुग्ण विदर्भात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात  ३४ हजार ४६५, गाेदिंया जिल्ह्यात १२ हजार ५४०, भंडारा जिल्ह्यात  १३ हजार २००, नागपूर जिल्ह्यात २६ हजार ७६२, वर्धा जिल्ह्यात १४ हजार ८२ रुग्ण सिकलसेल ग्रस्त आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्ये आदिवासी दलित व मागासवर्गीय समाजात सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. 
सिकल सेल हा आजार गंभीर स्‍वरुपाचा असुन यामध्‍ये लाल रक्‍तपेशी काही परिस्थितीत आपला गोल आकार बदलून विळयाच्‍या होतात. सर्वसाधारणपणे रक्‍तपेशी हया गोल आकाराच्‍या असतात आणि त्‍या रक्‍तवाहिन्‍यांमधुन शरीराच्‍या सर्व भागांपर्यंत ऑक्‍सीजन सहज वाहुन नेतात. सिकल सेल असलेल्‍या रक्‍तपेशी रक्‍तवाहिन्‍यांमधुन सहज वाहुन जाऊ शकत नाहीत, त्‍या घटट आणि चिकट होतात. त्‍या रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये अडकुन राहिल्‍याने रक्‍तपुरवठयामध्‍ये अडथळा निर्माण होतो. त्‍यामुळे वेदना होतात. लाल रक्‍तपेशीच्‍या नष्‍ट होण्‍यामुळे अॅनिमिया व कावीळ होते.      
हा आजार जनुकीय दोषामुळे होत असल्याने तो आनुवंशिक आहे. आई- वडिलांकडून हा आजार अपत्यांमध्ये येतो. आनुवंशिक शास्त्राच्या नियमांनुसार हा दोष दोन प्रकारांत आढळतो. यातला एक प्रकार म्हणजे ‘सिकल सेल वाहक’ (कॅरिअर) आणि दुसरा म्हणजे ‘सिकल सेल पीडित’ (सफरर). वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. व्यक्तीच्या रक्ताची प्रयोगशाळेत चाचणी केल्यावर या आजाराचे निदान करता येते. गुणधर्म ओळखण्यासाठी रक्ताची ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ करण्‍यात येते. पण व्यक्ती वाहक आहे की पीडित, हे ओळखण्यासाठी रक्ताची आणखी एक चाचणी करावी लागते. या चाचणीला ‘इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट’ म्हणतात. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये सिकल सेल रक्तदोष तपासणी सुविधा उपलब्ध आहे. सरकारी दवाखाने व रुग्णालयांमध्ये सिकल सेल आजाराची माहिती, मोफत सोल्यूबिलिटी चाचणी, समुपदेशन, इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी, फॉलिक ऍसिड गोळ्या, अँटिबायोटिक्स तसेच वेदनाशामक गोळ्या, रक्त चाचण्या, रक्तसंक्रमन, टेलिमेडिसीन सेवा उपलब्ध आहेत.
या आजाराच्या रुग्णांमध्ये शारिरिक थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, डोळे पिवळसर दिसणे अशी लक्षणे आजाराच्या प्ररंभी दिसतात. ऋतू बदलांमध्ये या आजाराची तीव्रता वाढते. व्यक्तीला थंडी ताप किंवा जुलाब- उलटय़ांसारखा आजार झाला असेल तर शरीराला अतिरिक्त प्राणवायूची गरज भासत असते. अतिश्रम केल्यावरही शरीराला प्राणवायू अधिक लागत असतो. वेडय़ावाकडय़ा सिकल सेल्स रुग्णाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात आणि त्या रक्तवाहिनीतला रक्तपुरवठा खंडित होतो. शरीराच्या ज्या भागात ही प्रक्रिया घडते तिथे रुग्णाला प्रचंड वेदना होतात. वैद्यकीय भाषेत याला ‘क्रायसिस’ असे म्हणतात. अशा वेळी ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. रुग्णाला क्रायसिस येण्याची ही प्रक्रिया अधुनमधून होत राहते. सतत क्रायसिस येत राहिले तर शरीरातील विविध अवयवांवर विपरित परिणाम होण्यास सुरूवात होते. ही लक्षणे या आजाराच्या रुग्णाला वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांपासून दिसू लागतात. वय वाढते तशी लक्षणांची तीव्रता वाढते.
शासनाच्‍या राष्‍ट्रीय आरोग्‍य मिशनअंतर्गत सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन या कार्यक्रमांतर्गत सिकल सेल आजाराविषयी जनजागृती, निदान तसेच उपचारांची माहिती जनसामान्‍यांपर्यंत पोहाचवण्‍यात येत आहे. सिकल सेल रुग्‍णांचा शोध घेऊन रुग्‍ण व्‍यकतींना लाल, वाहक व्‍यक्‍तींना व पिवळे तर निरोगी व्‍यक्‍तींना पांढ-या कार्डचे वाटप करण्‍यात येत आहे. रुग्‍ण व वाहक व्‍यक्‍तींना विवाहाबाबत तसेच कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करण्‍यात येते तर रुग्‍णांना नियमित उपचारांबाबत मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. रुग्‍ण किंवा वाहक गरोदर महिलांना प्रसुतीपूर्व निदान करण्‍यास तसेच आवश्‍यकता भासल्‍यास वैदयकीय गर्भपाताबाबत समुपदेशन करण्‍यात येते. रुग्‍ण व्‍यक्‍तींच्‍या गरजेनुसार फॉलीक अॅसीडच्‍या गोळया, अॅन्‍टीबायोटीक्‍स (प्रतिजैविके), तसेच पेनकिलर्सची सोय प्राथमिक आरोग्‍य केंद्रात तसेच रक्‍तसंक्रमणाची सोय ग्रामीण, उपजिल्‍हा व जिल्‍हा रुग्‍णालयात करण्‍याचे उददीष्‍ट या कार्यक्रमाचे आहे. प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण /उपजिल्‍हा रुग्‍णालयांत मोफत सोल्‍यूबिलीटी चाचण्‍या करण्‍यात येत असुन पॉझीटीव्‍ह आढळलेल्‍या व्‍यक्‍तींना निश्चित निदान करण्‍यासाठी इलेक्‍ट्रोफोरेसिस चाचणी करण्‍यासाठी नजिकच्‍या शासकीय रुग्‍णालयांत संदर्भीत केले जाते. सिकल सेल रुग्‍णांच्‍या उपचारासाठी सरकारी वैदयकीय अधिकारी व इतर कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्‍यात येत आहे. या आजाराचे गांभिर्य लक्षात घेता शासकीय स्‍तरावर त्‍याचे संनिंयंत्रण व योग्‍य उपचारपध्‍दती राबविण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येत आहेत. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त