अन्यथा मुंबई वाहनांच्या विळख्यात
- Get link
- X
- Other Apps
कोरोना काळात सार्वजनिक वाहतूकीवर मोठया मर्यादा आल्या. रेल्वे, बस, रिक्शा, टॅक्सी यासारखी सार्वजनिक वाहतूकीची साधने मर्यादीत प्रमाणात रस्त्यावर धावत होती. कोरोना संक्रमण काळ अजून संपलेला नसल्याने ही वाहतूक अदयाप पूर्वपदावर आलेली नाही. मुंबईची जिवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे वाहतूक सर्वसामान्यांसाठी अदयापी सुरु झालेली नाही. साहजिकच याचा भार खाजगी वाहतूक व वाहनांवर पडलेला आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खाजगी वाहनांची संख्या सध्या प्रचंड वाढलेली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठया प्रमाणावर आ वासुन उभा आहे. वाशीच्या टोलनाक्यावर तर दररोज दोन ते तीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सहज, सुलभ व सर्वांना परवडेल अशी वाहतूक म्हणून ओळखली जाणा-या दुचाकींच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. चालू वर्षी जानेवारीपासुन एकटया मुंबईत तब्बल १ लाख दुचाकींची भर पडलेली आहे. मुंबईत प्रति किलोमिटर रस्त्यांवर जवळपास १२०० दुचाकी धावत आहेत. सार्वजनिक वाहतूकीच्या साधनांची कमतरता पाहता दुचाकी खरेदीकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. विशेषतः रोज प्रवास करण्यासाठी महिलांचा स्कुटर खरेदीकडे वाढता कल आहे. गेल्या वर्षाभरात वडाळा आरटीओत जवळपास ३००००, ताडदेव आरटीओत २८०००, बोरीवली आरटीओत २६७०० व अंधेरी आरटीओत १९००० दुचाकींची नोंद झालेली आहे. मुंबईतील ३९ लाख वाहनांपैकी ६० टक्के दुचाकी आहेत. गेल्या तीन वर्षांत दुचाकींच्या संख्येत मुंबईत २४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. येत्या काळात ही संख्या भरमसाठ संख्येने वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. रहदारी व पार्किंगचा यक्षप्रश्नदेखील जलद गतीने वाढत आहे. यासाठी कुठेतरी वाहनखरेदी व विक्रीवर निर्बंध आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भरमसाठ संख्येने वाढत चाललेला हा वाहनांचा भस्मासूर रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत अन्यथा येत्या काळात मुंबई वाहनांच्या विळख्यात सापडणार हे निश्चीत.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment