असले कसले नववर्ष स्वागत

कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर सरकारने अनेक बंधने घातली असली तरी इंग्रजी नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र मोठ्या जोशात तयारी सुरू झाली आहे. समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे गर्दीने हाऊसफुल्ल होणार हे‍ निश्‍चीत आहे. खरेतर लोकांना नववर्षाच्या स्वागतापेक्षा मौज मजा व पर्यटनासाठी ३१ दिसेम्बर म्हणजे एक हक्काचा उत्सव आहे असेच वाटत असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही हिंदू नववर्ष सुरू होणाऱ्या दिवशी इतका उत्साह न दाखवणाऱ्या मुंबई महाराष्ट्रातील हौशी मंडळींचा अत्यानंद ३१ डिसेंम्बरचे निमित्त साधून मात्र ओसंडून वाहताना दिसतो. अनेक पर्यटन स्थळे व हॉटेल्समध्ये तर मद्यपान करणाऱ्यांसाठी विशेष सरबराई असते. दारू व जेवणासाठी अनेक आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आकर्षित करण्यामागे सर्व हॉटेल व्यावसायिक व इव्हेंट मॅनेजर आघाडीवर आहेत. ३१ डिसेंम्बरच्या मागेपुढे दोनचार दिवस पोलीस व सुरक्षा यंत्रणांना अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून खडा पहारा द्यायला लावण्यात कोणता शहाणपणा आहे समजत नाही. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी नववर्षाची ही सुरुवात केवळ नशाबाजी, धांगडधिंगा व गुन्हेगारीचे स्वरूप असलेली बनत चालल्याने सुसंस्कृत मंडळी यापासून चार हात लांबच राहणे पसंद करतात. ख्रिसमस व ३१ डिसेंबरला शिगेला पोहोचलेला हा उत्साह हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला मात्र कुठे असतो कुणास ठावूक ? रात्रभर मद्यपान करून नवीन वर्षाच्या पहाटे धुंद अवस्थेत उशिरापर्यंत कोलमडून राहणे हे कसले स्वागत ? आजकालचे लोक पुढारलेत पण सुसंस्कृतपणा लोप पावत चाललाय हेच खरे !!



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त