व्हर्च्युअल दुनियेत
२६ डिसेंम्बरचे मुशाफिरी सदर वाचले. अत्यंत वेगळा पण सध्याच्या परिस्थितीतील सर्वांच्या जवळचा विषय यात मांडलेला आहे. ऑनलाईन संस्कृती आज सर्वच स्तरांतील घटकांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहे. सभा, कार्यक्रमांच्या ठिकाणची गर्दी व या गर्दीत विविध आजारांच्या संसर्गाचा धोका पाहता गेल्या वर्षभरापासून ऑनलाईल कवी संमेलने, व्याख्याने, पुरस्कार सोहळे, उदघाटने, गायन, नृत्य यांचे सादरीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये वक्ता व श्रोते अलिप्त राहून आपली कला सादर करणे असो वा श्रोत्याची भूमिका निभावण्याच्या भूमिकेत सामील होत असले तरी त्यामध्ये एकाग्रता व परिणामकरता अधिक प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे. एखादा कार्यक्रम आयोजित करण्यातील खर्च, त्या ठिकाणी उपस्थित राहण्याकामी खर्ची पडणारी दगदग व इतर अनेक गोष्टींची बचत या ऑनलाईन ट्रेंडने होत असल्याने हा मार्ग नक्कीच किफायतशीर आहे. मात्र त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक सहाय्यभूत घटकांची मात्र गळचेपी होत आहे हेदेखील मान्य करावेच लागेल. त्यामुळेच मुशाफिरीत दोन्ही बाजूंचा केलेला विचार नक्कीच स्वीकारार्ह आहे. यंदाचे वर्ष मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून असो की नोकरदार वर्गाच्या कामाच्या अनुषंगाने असो सर्वच पातळ्यांवर ऑनलाईन पद्धतीने घरूनच पार पडलेले आहे. यात कुटुंबासह अधिक वेळ व्यतीत करून त्याद्वारे निर्माण झालेली सकारात्मक मानसिकता कामाच्या वा शिक्षणाच्या ठिकाणी वापरता आली व एकंदरीत त्याची परिणामकारकता वाढली असेदेखील दिसून आले आहे. भविष्यात संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका पाहता सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्माण झालेला हा बदल स्वीकारायला काहीच हरकत नाही. येत्या काळात दैनंदिन जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार आहे. त्यामुळे भरगच्च सभा, कार्यक्रम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, शाळा यांची रेलचेल दिसणार आहे. मात्र ऑनलाईनच्या आभासी दुनियेने शिकवलेले व्यवहारिक व वास्तविक गणित दुर्लक्षित होऊ नये.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment