नियमित विजबिले भरणाऱ्यांचे काय
- Get link
- X
- Other Apps
वाढीव विजबिले माफ करण्यासाठी राजकीय पक्षांनी सध्या राज्यभरात रणकंदन माजवले आहे. लॉकडाऊन काळात रिडींग न घेता लॉकडाऊनपूर्वीचा विजेचा वापर पाहून सरासरी विजबिले पाठविण्यात आली. मात्र या काळात लोक घरीच असल्याने विजेचा वापर वाढला व रिडींग सरासरीपेक्षा जास्त होऊ लागले. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जेव्हा रिडींगप्रमाणे बिल आकारणी सुरु केली गेली तेव्हा रिडींगनुसार अपेक्षेपेक्षा जास्त विजबिले ग्राहकांना पाठविली गेली. एकदमच भरमसाठ विजबिलांचे आकडे पाहिल्यानंतर ग्राहकांवर विजबिलांचा अतिरीक्त बोजा आल्यासारखा झाला व मग गोंधळ सुरु झाला. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना वाढीव विजबिले भरणे अडचणीचे ठरत आहे ही बाब खरी आहे. अनेक ग्राहकांनी तर लॉकडाऊनमध्ये बिलेच न भरल्यामुळे त्यांच्या थकबाकीचे आकडेही खूप मोठे आहेत. त्यामुळे विजबिलांचा एकदम पडलेला आर्थिक भार सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. त्यामुळे विजबिलांमध्ये सवलत ही दिली गेलीच पाहिजे. मात्र सवलत देत असताना लॉकडाऊन काळातदेखील नियमित विजबिले भरणा-या नागरिकांचादेखील विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा विजबिलांची थकबाकी असणा-या ग्राहकांना बिलात सवलत वा माफी मिळेल व नियमित बिले भरणारे मात्र सवलतीपासुन वंचित राहतील असे व्हायला नको. तसेच वाढीव आलेली बिले भरणा-यांनादेखील वाढीव रक्कमेचा परतावा मिळायला हवा. विजेची बिले नियमित भरणा-या नागरीकांना बिल न भरल्यास विज कापली जाण्याची भिती असते. त्यामुळे ते या भितीपोटी नियमितपणे आपली विजबिले न चुकता भरतात. त्यांनादेखील संभाव्य सवलत योजनेत सामावुन घेणे गरजेचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment