संघर्षातून उभे राहिलेले निष्पक्ष वृत्तपत्र

आज सर्वसामान्य माणसाची आपले घर चालवताना होणारी कसरत अत्यंत संघर्षमय असते. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके गुरफटून गेलेलो असतो की सामाजिक दोष, उणिवा, क्लेश आपल्याला दिसत असूनही आपण त्याकडे कानाडोळा करतो. मात्र अनेक व्यक्ती सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कौटुंबिक आव्हाने पेलत सामाजिक सुधारणांचे शिवधनुष्यदेखील यशस्वीपणे पेलत आहेत. त्यातीलच एक म्हणजे वृत्तपत्रलेखक. समाजातील अनुचित, न पटणाऱ्या गोष्टींवर प्रहार करत सर्वसामान्यांना पटणारी मते तो आपल्या लेखणीतून वृत्तपत्रांमध्ये मांडत असतो. म्हणूनच तो समाजमनाचा आरसा म्हणूनदेखील ओळखला जातो. मात्र यातील अनेक आसामी यापुढे जात स्वतःचे वृत्तपत्र काढन्याचे स्वप्न रंगवतात व त्यात यशस्वीदेखील होतात. त्यातीलच एक म्हणजे आमचे मित्र श्रीमान पंकजकुमार पाटील. वृत्तपत्रलेखनापासून आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या पंकजकुमार यांनी आपले स्वतःचे एक वृत्तपत्र काढण्याचा विडा उचलला व तो यशस्वीपणे पेललादेखील. जानेवारी २०२० या पत्रकारदिनी पंकजकुमार यांनी "आदर्श वार्ताहर" या वृत्तपत्राचे (पाक्षिक) मुंबईतून प्रकाशन केले. आज हे वृत्तपत्र एक वर्षाचे झाले पूर्ण आहे. वृत्तपत्र सृष्टीत नव्याने दाखल झालेले सर्वसमावेशक, निःपक्ष, निर्भीड बाण्याचे मराठी पाक्षिक म्हणुन अल्पावधीतच या वृत्तपत्राचा नावलौकिक झाला. या पाक्षिकाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती अन वाचनप्रेरणा टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न नक्कीच झालेला आहे. आदर्श वार्ताहरच्या ब्लॉग साईटवर म्हणजेच ऑनलाईन वेब न्युज पोर्टलवर दररोजच्या घडामोडी प्रकाशित होत असतात. त्यामुळे वाचकदेखील या पोर्टलच्या माध्यमातून अपडेट राहतात. देश -विदेश यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या -घडामोडी, कर्तृत्ववान व्यक्तींचे लेख -मुलाखती, विशेष -प्रासंगिक, वैचारिक तसेच आरोग्य, शैक्षणिक विषयक लेख, प्रबोधनात्मक -सामाजिक कविता, चारोळ्या व अन्य साहित्य या वृत्तपत्रातून सातत्याने प्रकाशित होत आहे. वास्तविक एखादे वृत्तपत्र काढणे व ते अविरत सुरू ठेवणे सर्वसामान्य परिस्थितीतुन आलेल्या एका तरुणाला किती जिकिरीचे ठरत असेल हे अशा प्रकारचा प्रयत्न केलेल्यांना चांगलेच ठाऊक असणार. त्यामुळे पंकज कुमार यांनादेखील या परिस्थितीचा सामना करावा लागला नसता तरच नवल. आजकाल वृत्तपत्र अविरत सुरू ठेवण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ किंवा राजकीय वरदहस्त असावा लागतो. नोकरी करून वृत्तपत्राचा व्याप सांभाळणाऱ्या पंकजकुमार यांचेकडे आर्थिक बाजू मजबूत असणे शक्यच नव्हते आणि आदर्श वार्ताहर सारखे कुठल्याही राजकीय पक्षाला न वाहिलेले निष्पक्ष वृत्तपत्र एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या वरदहस्ताने चालणेदेखील दुरापास्त. मात्र विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत, सहकारी मित्रांची मदत घेत वृत्तपत्र क्षेत्रातील गेल्या वर्षभराचा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. खरेतर हे वृत्तपत्र प्रकाशित झाले व देशाला कोरोनाने वेढले, देश लॉकडाऊन झाला. व्यवसाय, दैनंदिन व्यवहारांबरोबर वृत्तपत्रक्षेत्रदेखील लॉकडाऊनच्या सावटाखाली गेले. अशा परिस्थितीत देखील ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आदर्श वार्ताहर सुरूच राहिले. बातम्या व लेखांचा रतीब वाचकांपर्यंत पोहोचवत राहिले. हे काम सहजसोपे मुळीच नव्हते. मात्र समाजप्रबोधनाचा ध्यास घेतलेल्या नव्हे पछाडलेल्या मानसिकतेला कशात बांधून ठेवणे शक्य नसते व तेच आदर्श वार्ताहरच्या बाबतीत घडले असेच म्हणावे लागेल. या वृत्तपत्राचा आजवरचा प्रवास व त्याच्या चढ उताराचा साक्षीदार होता आले याचे समाधान नक्कीच आहे. यापुढे देखील उत्तरोत्तर, वर्षानुवर्षे आदर्श वार्ताहरची दिमाखदार वाटचाल सुरूच राहो ह्याच वर्धापन दिनी शुभेच्छा !

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त