बर्ड फ्लू बाबत आवश्यक दक्षता घ्या

आपल्या देशात दर महिन्‍याकाठी ३० कोटी पोल्‍ट्रीतले पक्षी व ९०० कोटी अंडी खादयपदार्थांसाठी वापरली जातात असे एका आकडेवारीतुन समोर आले आहे. याच कोंबड्या व अंड्यांमधून बर्ड फ्लू हा आजार बळावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माणसामध्‍ये बर्ड फ्लू या विषाणूच्‍या संक्रमणामुळे कमाल मृत्‍यूदर ६० टक्‍क्‍यांपर्यंत असल्‍यामुळे चिंतेचे कारण नक्‍कीच आहे. आधीच कोरोना विषाणूने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असताना आता बर्ड फ्लू हा सन 2006 साली आपल्याकडे आलेला आजार पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. कोंबडया व अंडी यांमधून या आजाराच्या संसर्गाची भीती वर्तवण्यात येत असली तरी दक्षिण आशियातील इतर देशांच्‍या तुलनेत आपल्‍या देशातील स्‍वयंपाकाची पध्‍दत अशा आजारांपासुन दूर राहण्‍यासाठी लाभदायक मानली जाते. ७० डिग्री सेल्‍सीयसच्‍या वरील तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही व आपण शिजवणारे अन्‍न व मांस साधारणतः १०० डिग्रीच्‍या वर तापमानातील असते त्‍यामुळे इतक्‍या मोठया तापमानात हा विषाणू तग धरुन राहणे शक्‍यच नाही. त्‍यामुळे चिकन, अंडयांच्‍या माध्‍यमातून हा विषाणू माणसांमध्‍ये येण्‍याची शक्‍यता तशी फारच कमी आहे. मात्र तरीदेखील या विषाणूने बाधित पक्षी, पक्षांचे कच्चे अन्न याद्वारे संसर्गाचा धोका आहेच त्यामुळे आवश्‍यक काळजी घ्‍यायलाच पाहिजे. या रोगाचा मोठा फटका पोल्‍ट्री व्‍यवसायाला आगामी काळात बसण्‍याची शक्‍यता आहे. ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळले असून लोकांनी चिकन खाणे बंद केल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा