लसीबाबत संभ्रम नको

लसीकरणाची पथ्ये कुपथ्ये (लोकसत्ता 19 जानेवारी ) हा लेख कोविड लसीकरणाबाबतच्या शंका कुशकांवर प्रकाश टाकणारा आहे. कोविडच्या लसीबाबत अजूनही अनेकांच्या मनात मोठा संभ्रम आहे. त्यातून मार्ग काढत ही लस समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान सरकारसमोर नक्कीच आहे. आगामी काळात देशातील कोट्यवधी लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लस दिलेल्या व्यक्तीची शारीरिक रचना व इतर व्याधींच्या स्थितीनुसार लसीची परिणामकारकता कमी अधिक असणार आहे ही जाण सर्वांना असायला हवी. त्यामुळेच काहींच्या बाबतीत किरकोळ तक्रारी संभवतात मात्र त्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवरच संशय घेणे उचित नाही. लस देण्यासाठीचे सरकारचे नियोजन उत्तम आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे सातत्याने रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांना सुरुवातीला लस देण्याचा निर्णय रास्तच आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना ह्या लसीचे भवितव्य देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरते. पूर्वपदावर येत असलेले जनजीवन व लसीची उपलब्धता लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे माध्यमांनीही लसीसंदर्भात वार्तांकन करताना संवेदनशीलता व सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. चुकीच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये लसीबाबतचा संभ्रम वाढत जातो व 'बुंद से गयी वो हौद से नही आती' या उक्तीप्रमाणे पुन्हा लोकांच्या मनात विश्वासार्हता मिळवण्यास वेळ लागेल. सध्याच्या परिस्थितीत सर्वच लोकांना ही लस मोफत देण्याची मागणी योग्यच असली तरी सधन लोकांसाठी लस विकत घेण्याचा पर्यायदेखील उपलब्ध केल्यास सरकारवरील भार हलका होईल. यासाठी अनेक फर्मासिटीकल कँपन्या लसीची माफक दरात विक्री करण्यास तयार होतील. सार्वत्रिक लसीकरणात या लसीचा समावेश करण्यासाठीदेखील जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संस्थेची मदत घेता येईल. एकंदरीत कोविड लसीबाबत सकारात्मक संदेश देण्यात आजवर सरकारला आलेले यश टिकवून ठेवण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न अपेक्षित आहेत.

 वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त