आता बर्ड फ्लू..


आता बर्ड फलू..


कोरोनाचा कहर उतरत चालल्‍याचे चित्र सर्वत्र असतानाच आता नव्‍या आजाराचे सावट देशावर घोंघावत आहे. बर्ड फ्लू (Bird Flue) नामक रोगाचा धोका देशभर वाढताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत पक्षी आढळुन आले आहेत. त्‍यातील काही राज्यांतील बहुतांश पक्षांना बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्‍ट्रासह उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या ७ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढत चाललेला आहे. शनिवारपर्यंत पूर्ण देशात १२०० पेक्षा अधिक पक्षांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू संक्रमण अर्थात 'एव्हियन एन्फ्लुएन्जा' या आजाराचा आर्थिक फटका संबंधित व्यवसायिकांना बसत आहे. हा विषाणू पक्षांच्‍या संपर्कातून माणसाच्‍या शरीरात प्रवेश करण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे माणसासाठीदेखील याचा मोठा धोका आहे. माणसामध्‍ये या विषाणूच्‍या संक्रमणामुळे कमाल मृत्‍यूदर ६० टक्‍क्‍यांपर्यंत असल्‍यामुळे चिंतेचे कारण नक्‍कीच आहे. या आजारासंदर्भात आपल्‍याकडे सर्वात मोठा धोका कोंबडया व अंडी यांमधून होणारा संसर्गाचा मानला जातो. मात्र दक्षिण आशियातील इतर देशांच्‍या तुलनेत आपल्‍या देशातील स्‍वयंपाकाची  पध्‍दत अशा आजारांपासुन दूर राहण्‍यासाठी लाभदायक मानली जाते. ७० डिग्री सेल्‍सीयसच्‍या वरील तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही व आपण शिजवणारे अन्‍न व मांस साधारणतः १०० डिग्रीच्‍या वर तापमानातील असते त्‍यामुळे इतक्‍या मोठया तापमानात हा विषाणू तग धरुन राहणे शक्‍यच नाही. त्‍यामुळे चिकन, अंडयांच्‍या माध्‍यमातून हा विषाणू माणसांमध्‍ये येण्‍याची शक्‍यता तशी फारच कमी आहे. मात्र तरीदेखील आवश्‍यक काळजी घ्‍यायलाच पाहिजे. देशात दर महिन्‍याकाठी ३० कोटी पोल्‍ट्रीतले पक्षी व ९०० कोटी अंडी खादयपदार्थांसाठी वापरली जातात असे आकडेवारीतुन समोर आले आहे. त्‍यामुळे या रोगाचा मोठा फटका पोल्‍ट्री व्‍यवसायाला आगामी काळात बसण्‍याची शक्‍यता आहे. या आजाराचा सर्वात मोठा धोका पोल्‍ट्री फार्म सारख्‍या ठिकाणी काम करणा-या लोकांना आहे. बर्ड फलूच्‍या पार्श्‍वभुमीवर पशूसंवर्धन, वन विभाग, सार्वजनिक आरोग्‍य विभाग व कृषी विभाग यांनी एकत्रितपणे समन्‍वयाने प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे काम करण्‍याची आवश्‍यकता आहे. बर्ड फलू हा विषाणू स्‍थलांतरीत पक्षांमध्‍ये अधिक प्रमाणात आढळतो. असे पक्षी सर्वत्र कमी अधिक फरकाने दिसून येतात. महाराष्‍ट्रातदेखील पुणे, सोलापूर, गोंदिया अशा ठिकाणी हे स्‍थलांतरीत पक्षी प्रामुख्‍याने हिवाळयात आढळून येतात. या आजारापासुन दूर राहण्‍यासाठी आवश्‍यक काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे. पक्षी स्‍त्रावासोबत संपर्क टाळायला हवा. पक्षी, कोंबडया यांना ज्‍या भांडयात खादय दिले जाते त्‍या भांडयांची व्‍यवस्‍थीतपणे साफसफाई केली पाहिजे. रस्‍त्‍यातील मरण पावलेल्‍या पक्षांना उघडया हातांनी स्‍पर्श टाळला पाहिजे. पोल्‍ट्री उत्‍पादनांसोबत काम करताना हात पाणी, साबणाने वारंवार घुतले पाहिजेत. व्‍यक्‍तीगत व परिसराच्‍या स्‍वच्‍छतेवर भर दिला पाहिजे. कच्‍चे चिकन, उत्‍पादनांसोबत काम करताना मास्‍क व ग्‍लोव्‍हचा वापर बंधनकारक करायला हवा. पूर्ण शिजवलेले अन्‍नच सेवन करावे. कच्‍चे चिकन, कच्‍ची अंडी खाणे टाळले पाहिजे. अर्धवट शिजलेले चिकन, पक्षी, अंडी खाणेदेखील टाळायला हवे. आजारी, सुस्‍त पक्षांचा संपर्क टाळावा. यासंदर्भात शासनस्‍तरावरुन आवश्‍यक उपाययोजना करण्‍यात येत आहेत. मात्र नागरीकांनीही याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. उदभवणा-या नवनवीन विषाणूंचा सामना करण्‍यासाठी शासकीय यंत्रणा व नागरीकांमध्‍ये योग्‍य समन्‍वय असायला हवा. यासाठी कोरोनासारख्‍या जागतिक महामारीच्‍या विषाणूचा मुकाबला करण्‍यास सक्षम ठरलेलो आपण उचित प्रतिबंधात्‍मक दक्षता घेऊन बर्ड फलूसारख्‍या आजाराला देखील परतवून लावू शकतो हा आशावाद टिकवून ठेवायला हवा.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई    


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त