केलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न
सुरू होणारे प्रत्येक नवे वर्ष आपले आयुष्य एका वर्षाने कमी करणारे असले तरी उर्वरित आयुष्यात सुखासमाधानाने जगण्यासाठी नव्या वर्षाच्या निमित्ताने संकल्प हे करायलाच हवेत. यंदाच्या पूर्ण वर्षात कोरोना विषाणूने जगभरात मृत्यूतांडव केले. आपल्यातलेच अनेक जण नवे वर्ष पाहण्यासाठी उरले नाहीत इतकी विदारक परिस्थिती चार महिन्यांपूर्वी होती. आरोग्य व कोरोना प्रदूर्भावाच्या बाबत उचित प्रतिबंधात्मक दक्षता घेणारे आजवर सुदैवाने या विषाणूच्या कचाट्यात सापडलेले नाहीत. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत आजवर घेत असलेली काळजी यापुढेदेखील कायम राखण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. नव्या वर्षात मास्क, स्वच्छता, सामाजिक अंतर या बाबींचे कटाक्षाने पालन केले तर कोरोनाच काय, येणारे इतर नवनवे संसर्गजन्य विषाणू आपल्याला बाधणार नाहीत. त्याव्यतिरिक्त प्रत्येकाने आपल्या आयुष्यात प्रापंचिक जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त एखादा आवडीचा छंद जोपासावा व तो टिकवण्याचा संकल्प करावा. हाच छंद आपल्याला पुढील आयुष्य समाधानाने जगण्याचे बळ देऊन जाईल. माझ्या बाबतीत सांगायचे तर दरवर्षी मी गेल्या वर्षीपेक्षा अधिक व नाविन्यपूर्ण विषयांवर लिखाण करण्याचा संकल्प करतो व तो तडीस नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपणदेखील आपले आरोग्य अबाधित राखण्याचा व आयुष्यात एकतरी छंद जोपासण्याचा, टिकवण्याचा संकल्प नक्कीच करावा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment