या निमित्ताने तरी पीएमसी मुद्दा चर्चेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्‍या पत्‍नी वर्षा राऊत यांना सक्‍त वसुली संचालनालय म्‍हणजे ईडीने बजावलेल्‍या नोटीशीच्‍या निमित्‍ताने पंजाब अॅंड महाराष्‍ट्र को ऑपरेटीव्‍ह बॅंकेचा मुददा पुन्‍हा एकदा चर्चेला आलेला आहे. रिझर्व्‍ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घालुन वर्ष झाले तरी हया बॅंकेतील खातेदारांना अदयाप आपले हक्‍काचे व कष्‍टाचे पैसे बॅंक खात्‍यातुन परत मिळालेले नाहीत. याअगोदर येस बॅंक व लक्ष्‍मी विलास बॅंकांवर आरबीआयने घातलेले आर्थिक निर्बंध काही दिवसांतच उठवण्‍यात आले मात्र पीएमसी बॅंकेच्‍या बाबतीत मात्र तसे घडले नाही. या बॅंकेच्‍या पुनरुज्‍जीवनासाठी भागीदार शोधण्‍याची प्रक्रिया बॅंकेच्‍या प्रशासकांमार्फत सुरु करण्‍यात आली आहे. वास्‍ताविक, सहकार क्षेत्रातील पीएमसी बॅंक ही अग्रगण्‍य बॅंक समजली जात होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्‍या नागरी भागांत या बॅंकेच्‍या अनेक शाखा सर्वसामान्‍य वस्‍तीच्‍या ठीकाणी अस्तित्‍वात आहेत. त्‍यामुळे या बॅंकेचे लाखो खातेधारक हे सर्वसामान्‍य नागरीक, किरकोळ व्‍यावसायिक, सहकारी गृहनिर्माण सोसायटया, धार्मिक संस्‍था, सेवानिवृत्‍त कर्मचारी, जेष्‍ठ नागरीक अशा प्रकारचे आहेत. त्‍यामुळे या बॅंकेवरील निर्बंधांचा मोठा फटका समाजातील आर्थिकदृष्‍टया सामान्‍य घटकांना बसलेला आहे. बॅंकेतील घोटाळयासाठी जबाबदार अनेकजण आज तुरुंगात असुन त्‍यांच्‍याकडून युध्‍दपातळीवर कर्जाची वसुली करणे अपेक्षित असताना त्‍यादृष्‍टीने सुरु असलेले प्रयत्‍न अत्‍यंत संथ आहेत. त्‍यामुळे बॅंक कधी पुनरुज्‍जीवीत होईल याची सध्‍यातरी शाश्‍वती नाही. खातेधारकांच्‍या ठेवी कधी परत मिळतील याबाबत आरबीआयकडून अदयाप कोणतेही अधिकृत वक्‍तव्‍य करण्‍यात आलेले नाही. बॅंकेवर निर्बंध आणताना आरबीआयकडे बॅंक खातेधारकांच्‍या खात्‍यातील ठेवी तात्‍काळ परत मिळवून देण्‍यासाठी नियोजन असायला हवे होते मात्र वर्षभरानंतरदेखील अजुन खातेधारक आपल्‍या कष्‍टाच्‍या स्‍वकमाईसाठी धडपडत आहेत. वर्षा राऊत यांना इडीने पीएमसी बॅंकेसंदर्भातील एका जुन्‍या प्रकरणात पाठविलेल्‍या नोटीशीनंतर ज्‍या चवीने हा मुददा प्रसारमाध्‍यमांवर चर्चीला जातोय त्‍या तळमळीने बॅंकेतील घोटाळयानंतर पीएमसी खातेधारकांचा विचार झालेला नाही ही वस्‍तुस्थिती दुर्दैवी आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त