न पटणारा देवमाणूस

भामटेगिरीत पटाईत असलेली एखादी व्यक्ती अख्ख्या गावाला हातोहात फसवते. परिणामी खुनही करून ते पचवण्याचे धाडस करते. ज्यांच्या लक्षात ही भामटेगिरी येते त्यांनाच संपवण्याचे पराक्रम दाखवणारी देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. शॉर्टकट पैसा मिळवण्याच्या नादात चक्क बोगस डॉक्टर बनून वावरणारा तथाकथित डॉ अजित कुमार एका गावात आपले बस्तान बसवून तेथील लोकांना फसवण्याचे काम करतोय. देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन जगणारा एक डॉक्टर लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय दमदार आहे यात शंका नाही. चांगुलपणाच्या पडद्याआड घडणारा हा थरार आपल्याला टिव्हीजवळ नक्कीच खिळवून ठेवणारा असला तरी वास्तववादी नक्कीच नाही. दिवसाढवळ्या व रात्रीअपरात्री कुणालाही कळू न देता डॉक्टर लोकांचे खून करतो व त्यातून सहीसलामत निसटतो हे न पटणारे वास्तव आहे. त्याला मदत करणारी डिंपल (अस्मिता देशमुख) ही व्यक्तिरेखादेखील कल्पनेच्या पलीकडे डॉक्टरला साथ देते. सुरुवातीला डॉक्टरची भामटेगिरी अचूक ओळखणारे अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने साकारलेले मंजुळाचे पात्रही अनपेक्षितपणे डॉक्टरवर इतका आंधळा विश्वास कसा ठेवू शकते हादेखील प्रश्न मालिका पाहताना पडतो. असे असले तरी मालिकेतील कलाकारांचा अभिनय व कथेतील थरार मालिकेतील पुढील भाग पाहण्यास प्रवृत्त करतो एव्हढे नक्की. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त