लोकभावना अशीही

लोकभावना अशी आणि तशीही या मुशाफिरीत सुप्त, उग्र व शिस्तबद्ध लोकभावनांचा समग्र आढावा घेतलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वाचकांच्या पत्रांना देत असलेले महत्व व त्या पत्रांतील भावनांना कृतीद्वारे देत असलेला सन्मान सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहे. याच कारणांमुळे दिवसेंदिवस नवपत्रलेखकांची संख्या रोडावत चालली आहे. वृत्तपत्रांतील पत्रांना न्यायच मिळत नसेल अशा रकान्यांचा उद्देश तरी काय याचा विचार वृत्तपत्रमालकांनी करण्याची गरज आहे. राहिला प्रश्न लोकभावनांचा, तर आज सर्वसामान्य लोकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याचे काम वृत्तपत्रलेखकांशिवाय इतर कुठला घटक प्रभावी व पोटतिडकीने क्वचितच करत असेल. राजकीय आंदोलने, जनआंदोलन, शेतकरी आंदोलने यांचे स्थान केवळ नेत्यांना समृद्ध करणे इतकेच राहिल्याचे दिसून येत आहे. कृषी कायद्यांसाठी दोन तीन महिने आंदोलन करून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नसेल, वीजबिल माफीच्या लोकभावनेला केराची टोपली दाखवली जात असेल, नवी मुंबई विमानतळाला स्थानिक व शेतकरी नेते स्व दि बा पाटलांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी दुर्लक्षित केली जात असेल, इंधन दरवाढीविरोधात कितीही आंदोलने केली तरी त्याचे फलित काहीच नसेल तर अशा लोकभावनांचे सरकारदरबारी स्थान ते काय? संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ न देणारा आमचा महाराष्ट्र, कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला एकदिलाने करत असताना सरकारी आवाहनाला साथ देणारा आमचा देश जर देशातील नागरिक, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिपुत्र यांच्या आंदोलनाप्रति उदासीनता दाखवत असेल तर अशा आंदोलने, वृत्तपत्रलेखन, मागण्या यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या लोकभावनांना अर्थ तो काय उरतो? 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त