इंधन करामध्ये पारदर्शकता हवी
- Get link
- X
- Other Apps
इंधन दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीय. पेट्रोल नव्वदीपार तर डिझेल ऐंशी रुपयांच्या घरात आहे. लवकरच ते शंभरी गाठणार असेच दिसते. मात्र देशात निरनिराळे मुद्दे काढून दरवाढीचे सूत्र सोयीस्कररित्या लपवले जात आहे अशी शंका घेण्यास वाव आहे. आंतराष्ट्रीय बाजारात तेलाची आधारभूत किंमत पन्नास रुपयांच्या आत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार, विक्रेते यांचा मिळून भारतीय कर तितकाच होत असल्यामुळे साधारणतः इंधनाचे दर दुप्पट वेगाने देशात वाढले आहेत. केंद्र सरकार तीस टक्क्यांच्या वर कर लावते म्हणून राज्य सरकारांनीही हा कर 19 टक्यांपर्यंत नेला तर विक्रेत्यांनीही आपली कमाई यात दोन रुपयांवरून साडेतीन रुपये करून दुप्पटीने वाढवून घेतली. सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडणारी आहे. सर्वसामान्य माणूस दररोज सरकारला भरत असलेल्या करामधील 15 ते 20 टक्के वाटा हा इंधनावरील कराचा आहे. मात्र राजकीय व माध्यमांच्या बळावर ही बाब सोयीस्कररित्या लपवली जात आहे. इंधनेतर कर वसूल करण्यात सरकारला येत असलेले अपयश झाकण्यासाठी सोपा व जवळचा मार्ग म्हणून इंधन दरवाढीचा पर्याय दरवेळी निवडला जातो जो थेट सामान्यांच्या मुळावर उठणारा आहे. त्यापेक्षा सरकारने करबुडवे, घोटाळेबाज व सरकारची आर्थिक बाजू कमकुवत करणाऱ्या घटकांकडे लक्ष केंद्रित करायला हवे. त्यांच्याकडून येणी वसूल करण्यासाठी कठोरता दाखवावी. एकीकडे कोरोनानंतर वस्तू व सेवा कराची वसुली सुरू झाल्याचा दावा करायचा व दुसरीकडे इंधन दरवाढीच्या रुपात जनतेच्या खिशातच हात घालायचा हा प्रकार चांगल्या आर्थिक नियोजनाला पूरक नाही. शंभरीला टेकत चाललेल्या इंधनाचे दर सुशासनाचे प्रतीक नक्कीच नाही. यातून केवळ जनतेचा टाहोच ऐकायला मिळेल. आज सर्व बाजुंनी इंधनावर अवलंबून असलेली जनता सरकारचा करवाढीचा हा सोपा मार्ग कदापि स्वीकारणार नाही. आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती व आपल्या देशातील विविध करांनी फुगलेल्या इंधनाच्या किंमती यातील तफावत दैनंदिन जीवनात थेट फटका बसूनही आपल्या लक्षात येत नसेल अवघड आहे. यासाठी सरकारी करामध्ये कपात करून इंधन दर आटोक्यात राहण्यासाठी सरकारवरील दबाव येत्या काळात वाढवला गेला पाहिजे. निदान कच्च्या तेलाच्या किंमती, इंधनाचे उत्पादन, सरकारी कर, विक्रेत्यांचे शुल्क या बाबींमध्ये पारदर्शकता आणून सर्वसामान्यांना दरवाढीचे गणित कळायलाच पाहिजे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment