करते कोण आणि भोगते कोण
करते कोण आणि भोगते कोण या मुशाफिरीतून अत्यंत महत्वाच्या व संवेदनशील विषयाला हात घातला आहे. नवी मुंबई मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव झुंजारे व त्यांच्या आई, पत्नी व मुलीचे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मागील आठवड्यात दुर्दैवी अपघाती निधन झाले. हृदय हेलावून टाकणारी अत्यन्त क्लेशदायक अशी ही घटना. या अपघातात एका कंटेनर चालकाच्या चुकीने निष्पाप जीवांना मुकावे लागले. खरेतर असे अपघात दररोज सर्वत्र घडत असतात. दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होत असेल तर अपघातांचा विषय हा कोरोनापेक्षा महाभयंकर आहे. वर्षाकाठी दीड लाख मृत्यू देशात केवळ अपघाताने होत असतील तर साथरोगनियंत्रणाबरोबरच अपघात टाळण्यासाठीदेखील भरीव नियोजन युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. देशात वाहतूक व रस्ते नियोजनासाठी मोठमोठी सरकारी खाती केंद्रात व राज्यात कार्यरत आहेत. या खात्यांच्या माध्यमातून रस्ते बांधणी व वाहतुकीच्या नियमनावर कोट्यवधींचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र अपघात थांबण्याचे वा कमी होण्याचे नाव घेत नाहीत. वास्तविक आज सर्वत्र चकाचक रस्ते व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वाहने रस्त्यांवर फिरतात मात्र मानवी चुकांमुळे व वाहनांतील तांत्रिक बिघाडांमुळे होणारे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. त्यामुळे सरकारने आता वाहन निर्मिती व विक्रीवर कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात व देशात वाहन विक्रीवर आज अजिबात नियंत्रण नाही. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येत नवी वाहने दररोज नोंदणी होऊन रस्त्यावर उतरत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे वाहतूक नियोजनाचे तीनतेरा वाजत आहेत. पार्किंगची समस्या आज सर्वत्र उग्र रूप धारण करून आहे. तसेच याला पर्याय म्हणून पारंपरिक प्रवासाची साधने व सार्वजनिक वाहतूक सेवांची सहज उपलब्धतादेखील वाढवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधा जितक्या आरामदायी आहेत तितक्याच त्या जीवघेण्यादेखील ठरू शकतात हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांचा नियंत्रित वापरच हितावह आहे. अन्यथा रस्ते अपघातातील जीव जातच राहतील व अपघातास कारणीभूत घटक नामानिराळे राहून भोगणाऱ्यांच्या जीवाला घोर लागून राहणार एव्हढे नक्की.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment