..अशाने आयुर्वेद दूषित होईल

पतंजलीने निर्माण केलेल्‍या कथित कोरोना औषधाच्‍या अनावरणासाठी केंद्र शासनाच्‍या दोन मंत्र्यांनी उपस्थिती लावत या औषधाची स्‍तुतीदेखील केली. याला आक्षेप घेत देशातील प्रमुख वैदयक संघटना इंडियन मेडीकल असोसिऐशनने पतंजलीचा कोरोना औषधाचा दावा चुकीचा असल्‍याचे खडसावत मंत्रीमहोदयांनाच खुलासा करण्‍याचे आवाहन केले आहे. वास्‍ताविक आयुर्वेद हे एक शास्त्र असून त्याचा वापर व प्रसार पूर्वापार चालत आलेला आहे. मात्र काही व्यवसायधार्जिणे लोक याच आयुर्वेदाचा वापर स्‍वताच्‍या आर्थिक समृद्धीसाठी करताना दिसत आहेत. कोरोना आजाराने जगभरात मृत्यूतांडव माजवून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. याच भीतीचा वापर स्वार्थासाठी करून घेण्याचे प्रयत्न अनेकांचे सुरू आहेत. तसाच प्रकार पतंजलीच्या उत्पादनाला राजमान्यता देऊन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय वैद्यक परिषदेच्या सतर्कतेने जनतेची ही भलामण वेळीच समोर आणली आहे. वैदयकशास्‍त्राच्‍या सर्व चाचण्‍यांवर खरे उतरुन पतंजलीच्‍या औषधाने बाजारात एन्‍ट्री केली असती तर त्‍याची सर्वत्र वाहवा व स्‍वागतच झाले असते. मात्र शास्‍त्रीय निकषात न बसणा-या या कथित कोरोना औषधाच्‍या प्रचारासाठी थेट दोन दोन केंद्रिय मंत्री जाहिर कार्यक्रमात उतरतात हे जरा अस्‍वस्‍थ करणारेच आहे. ज्‍या जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या शिफारसीचा दावा उत्‍पादनाने केला तोदेखील खोटा असल्‍याचे खुदद डब्‍ल्‍यूएचओनेच जाहिर केले. आयुर्वेद शास्‍त्राचा प्रचार व प्रसार झालाच पाहिजे. कारण त्‍याची उपयुक्‍तता, सहजता व परिणामकारकता वेळोवेळी सिध्‍द झाली आहे. पण एखादया उत्‍पादकाला त्‍याच्‍या व्‍यावसायिक लाभासाठी पुरस्‍कृत करणे व तेदेखील परवानग्‍यांची खातरजमा न करता हे उचित नाही. अशाने आयुर्वेद उपचारांकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन दुषित होण्‍याची भिती आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई  


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त