ग्लॅमरवाल्यांची लोकप्रतिनिधीपदे

ग्लॅमरवाल्यांची लोकप्रतिनिधीपदे हे मुशाफिरी सदर कटू वास्तवावर बोट ठेवणारे आहे. राजकारण-फिल्म इंडस्ट्री हे समीकरण देशाला नवे नाही. पडद्यावरील अभिनयात हिट ठरलेल्या अनेक कलाकारांची राजकारणातील एन्ट्री सुखकर होऊन जाते. चंदेरी दुनियेतील प्रसिद्धीचा वापर मग राजकिय गणितांसाठी  घेण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा मतदार अशा कलाकारांना राजकीय गणवेशात स्वीकारतातदेखील. मात्र या राजकारणाची शाल अंगावर पांघरलेल्या एखाद्या कलावंताने राजकीय पदावर फार मोठी असामान्य कामगिरी केल्याचे दृष्टिपथात नाही. याला काही अपवाद असतीलही. जसे अमरावतीच्या खासदार व भूतकालीन तेलगू सिनेसृष्टीतील कलाकार नवनीत राणा ह्या बराच काळ लोकसेवेत राहिल्याचे व त्यामुळेच राजकीय पक्षाच्या आधारविना राजकारणात यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे. अन्यथा राज्यसभा, विधानसभा यासारख्या मागल्या दाराने लोकप्रतिनिधी पदाचा शुभारंभ करणारे अल्पकाळात सामाजिक जीवनातून संन्यास घेणारेही कमी नाहीत. ज्यांचा उल्लेख या मुशाफिरीत अगदी समर्पक पद्धतीने केलेला आहे. वास्तविक लोकांच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी व सिनेकलावन्त ह्या दोन भूमिका परस्पर भिन्न असतात. मात्र ज्यावेळी त्यांची सरमिसळ होते व कलावंत राजकारणी होऊ पाहतात तेव्हा लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात व सिनेस्टाईल पद्धतीने लोकांना भावेल अशा कामाची त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते मात्र नंतर त्याचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे कलाकारांनी काहीतरी ठोस भूमिका, धोरण व समाजनीती घेऊन राजकारणाच्या रिंगणात उतरावे व लोकांना अभिप्रेत लोकप्रतिधीची भूमिका वठवावी तर आणि तरच ह्या ग्लॅमरवाल्यांची लोकप्रतिनिधीपदे खऱ्या अर्थाने ग्लॅमरस ठरतील. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त