भेसळखोरांवर कारवाई व्हावी

विविध वस्तू वा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याचे किंवा नकली लेबल लाऊन त्यांची विक्री होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. मात्र आता आपल्या दररोजच्या वापरातील अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुट्या खाद्यतेलापैकी सुमारे 50 टक्के तेल भेसळयुक्त असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे. एफडीएनं ३० पथकं तयार करून सुट्या तेलाचे नमुने गोळा केले आणि ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. तेव्हा खाद्यतेलात केमिकल तसंच रंग मिसळण्यात आल्याचं आढळले. सुटं खाद्यतेल स्वस्त असतं. झोपडपट्टी तसंच ग्रामीण भागात या सुट्या तेलाला प्रचंड मागणी असते. त्यामुळंच तिथंच मोठ्या प्रमाणात बोगस तेलाची विक्री होत असल्याचं आढळलंय. एफडीएच्या धाडीत तब्बल 5 कोटी रुपयांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय. खाद्यतेल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज खाद्यतेलाचे अनेक ब्रँड बाजारात कमी अधिक किंमतीला उपलब्ध असतात. असे खाद्यतेल विकत घेताना ते भेसळयुक्त आहे किंवा कसे याबाबत खात्री केली जात नाही किंवा तशी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नसते. त्यामुळे भेसळीचे तेल ओळखणे तसे फार अवघडच. सुट्ट्या तेलाच्या बाबतीत तर शुद्धतेची अजिबात खात्री देता येत नाही. किंमतीने स्वस्त असल्याने झोपडपट्टी वस्त्या, ग्रामीण भाग व रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून ह्या तेलाचा सर्रास वापर केला जातो. मात्र आता त्यात 50 टक्क्यांपर्यंत भेसळ आढळल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. भेसळयुक्त तेलामुळे हार्ट अटॅकसह अनेक गँभिर आजार उद्भवतात. आज बहुतांश लोक विविध कारणांमुळे बाहेरील खाद्यपदार्थ खातात व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या शुद्धतेची शास्वती देता येत नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ह्या भेसळखोरांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा भेसळयुक्त तेलाची निर्मिती करणारे मोठे रॅकेट अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी मोहीम घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सुट्ट्या तेलाबरोबरच ब्रँडेड कँपन्यांचे तेल तपासण्यासाठीदेखील मोहीम हाती घ्यावी. लोकांमध्ये देखील यासाठी जनजागृती करून भेसळयुक्त तेल ओळखणारी सहजउपलब्ध यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 



Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त