आधी मतदार याद्यांतील घोळ मिटवा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस मतदार, एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, मयत मतदारांची नावे न वगळणे, बोगस मतदार नोंदणीसाठी पैशांची देवाणघेवाण अशा प्रकारचे गंभीर आरोप आता राजकीय नेत्यांकडून होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत मतदार याद्या पुन्हा एकदा नीट तपासून त्या अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. आगामी निवडणुका नवी मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील असणार आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत मातब्बर राजकीय पक्षांमध्ये होणार असल्यामुळे बोगस मतदान प्रशासनाला व निवडणूक आयोगाला परवडणार नाही. मात्र तसा प्रयत्न काही समाजकँटकांमार्फत सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाच वर्षांतून येणाऱ्या ह्या निवडणुकांसाठी खऱ्या मतदारांची प्रभागनिहाय ओळख पटवणे पालिकेसाठी अवघड नाही. निवासी पत्त्यानुसार तसे सर्वेक्षण पाच वर्षातून एकदा करणे पालिकेला सहज शक्य आहे. मात्र मतदारांची खातरजमाच होत नसल्याने बोगस मतदारांची नावे, फेरफार व अदलाबदली सहज केली जाते. यात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. मात्र यामुळे मतदार याद्या साशंक व गोंधळाच्या होऊन जातात व त्याचा फायदा लोकमान्यता नसणारे लोकप्रतिनिधी उठवतात. याअगोदरदेखील नवी मुंबईत प्रभाग आरक्षण, प्रभाग रचना आणि याद्यांमध्ये गोंधळ उजेडात आला आहे. नवी मुंबईत 111 प्रभागात एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे स्थलांतरीत करण्यात आल्याचे समोर येत आहे. एखादी व्यक्ती ज्या प्रभागात राहते तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे, अशा व्यक्तींची नावे इतर प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. अनेक नवी, अनोळखी, मयत मतदारांची नावे राहत नसलेल्या सोसायट्यांमध्ये समाविष्ट केल्याचे दिसून येत आहे. हे प्रकार सक्षम लोकशाहीला पूरक नसून नवी मुंबईसारख्या 21व्या शतकातील हायटेक शहरात असे प्रकार होत असतील तर ते दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाने त्वरित मतदार याद्यांमधील घोळ संपवण्यासाठी पावले उचलावीत. सर्वच प्रभागांमधील मतदारांचे पारदर्शक व वस्तुस्थितीजन्य सर्वेक्षण करावे व बोगस, चुकीची नावे वगळावीत आणि त्यानंतरच निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा