नुसते निर्बंध नको तर कडक अंमलबजावणीही हवी

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात सरकारने अनेक निर्बंध घातले असले तरी रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. दररोजची रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या आत यायलादेखील तयार नाही. यामुळे महाराष्ट्र रुग्णसंख्येच्या बाबतीत जगातील नंबर एकचे राज्य बनले आहे. राज्यातील चाचण्या व रुग्ण नोंदीतील पारदर्शकता ही कारणे याला असली अनियंत्रित लोकसंख्या व लोकांचा निष्काळजीपणा हे घटकदेखील याला कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. राज्यातील सुरक्षित जीवनमान, उद्योगधंदे व रोजगारासाठी पूरक वातावरण यामुळे देशाच्या इतर भागांतून मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. मात्र कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूसाठी हीच दाटीवाटी पोषक ठरतेय. सामाजिक अंतर राखण्याचे कितीही आवाहन सरकारने केले तरी फुगलेल्या लोकसंख्येत हा नियम पाळायचा कसा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने नियम कितीही कडक करून लोकांच्या भ्रमंतीवर निर्बंध लावले तरी लोक ऐकायला तयार नाहीत. प्रत्येक व्यक्ती, वस्ती, गाव या ठिकाणी या निर्बंधांची सक्तीने अंमलबजावणी करणारी इतकी मोठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्याचा सर्रास फायदा उठवण्यात येत आहे. त्यात सरकारने सार्वजनिक प्रवास, हॉटेल व्यवसाय, किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीवरील निर्बंध सैल ठेवले असल्याने लोकांचा बिनदिक्कतपणे मुक्त संचार सर्वत्र सुरू आहे. वास्तविक महाराष्ट्राचे आजचे विदारक चित्र पाहता निदान काही दिवस तरी संपूर्ण दैनंदिन व्यवहार व सार्वजनिक वाहतूक बंद करून कोरोनाची साखळी तोडायला हवी. आज लोकांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत, इंजेक्शन, ऑक्सिजन चा तुटवडा आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांत आणखी विदारक बनेल. त्याआधी त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असून कोरोनाची साखळी तोडायची असेल तर काही दिवस लोकांचा मुक्त संचार रोखायला हवा. यासाठी सरकारने केवळ निर्बंधांचा धाक न दाखवता अधिक कठोर भूमिका घेत लॉकडाऊनची सक्तीने अंमलबजावणी करायला हवी. राज्यातील कोरोना संक्रमण थांबवायचे असेल तर लोकांनीदेखील काही दिवस घरीच थांबून सरकारला सहकार्य करायला हवे. काही लोक प्रामाणिक पणे सरकारी नियमांचे पालन करताहेत व काही लोक त्याला फाटा देत मुक्त संचार करतायेत हे चित्र कामाचे नाही. दररोज सर्वत्र होत असलेली गर्दी पाहिली तर सध्याचा लॉकडाऊन काही उपयोगाचा नाही असेच दिसते. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त