रेमडेसीविरसाठी नियमावली हवी
- Get link
- X
- Other Apps
जेव्हा रेमडेसीवीरला वाचा फुटते हा लेख (दै लोकसत्ता दि. 22 एप्रिल) वाचला. रेमडेसीवीर या इंजेक्शनवरुन राज्यभरात सध्या सुरु असलेल्या गोंधळावर या लेखाव्दारे अगदी अचूक बोट ठेवण्यात आले आहे. सध्या सर्वत्र केवळ दोनच गोष्टींची बोंबांबोंब आहे. एक म्हणजे हॉस्पीटल बेड आणि दुसरे रेमडेसिवीर. या दोन गोष्टींसाठी लोकांची सर्वत्र वणवण सुरु आहे. अगदी व्याकुळ होऊन लोक त्यासाठी सगळीकडे याचना करत आहेत. वास्ताविक रेमडेसीवीर या इंजेक्शनचा वापर व उपयुक्तता याबाबत कमालीची अनभिज्ञता व संभ्रम असल्यामुळे कोविड रुग्ण रेमडेसिवीर मिळाले नाही तर दगावतो हा समज सोयीस्कररीत्या पसरला आहे. वास्ताविक , रेमडेसीवीर कोविडवर रामबाण इलाज नाहीच. शरीरात कोरोना पसरण्याच्या सुरुवातीच्या काळात हे औषध त्याची वाढ थांबवते. कोरोनाने शरीरावर ताबा मिळवल्यानंतर ते परिणामकारक नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा वापर मोफत व नियोजनबध्दरित्या सुरु आहे. त्यामुळे त्याची परिणामकारकतेचे मोजमाप व्यवस्थीतरीत्या होत आहे. मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये या औषधाचा सुरु असलेला अतिरेकी वापर रुग्ण व नातेवाईकांना घायाळ करणारा आहे. आधीच कोरोनाची भिती त्यात इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची फरफट सुरु आहे. इंजेक्शन मिळवण्यासाठी लोक रांगांमध्ये उभे राहतात, फोनाफोनी करतायेत, दामदुप्पट रक्कम देऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करतायेत, रडतायेत, अगदी हतबल होऊन काकुळतीला येत आहेत. राज्यभर दिसत असलेले हे चित्र उचित नसुन मनस्ताप वाढवणारे आहे. त्यामुळे रेमडेसीवीरसाठी सुरु असलेला हा आटापिटा कुठेतरी थांबविण्याची गरज आहे. त्याच्या वापराची सुत्रे तयार करुन जनजागृती गरजेची आहे. रेमडेसिवीर हे कोरोनावरील हुकमी औषध नसुन विषाणू पसरु नये यासाठी प्रतिबंधात्मक इलाज आहे. त्यामुळे त्याच्या वापरासाठी ठराविक नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच या इंजेक्शनची अवाजवी मागणी कमी करुन त्याच्या सहज उपलब्धतेसाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. तरच त्यासाठी सुरु असलेला आक्रोश थांबेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment