प्रेरणादायी धाडस

सेंट्रल रेल्वे मुंबई विभागाचे पॉईंटर मॅन मयुरेश शेळके याने 17 एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकात दाखवलेले धाडस अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याच्या प्रसंगावधानामुळे एका चिमुकल्याचे प्राण तर वाचलेच पण माणुसकी व समाजभान अजून जिवंत असल्याचेदेखील त्याने दाखवून दिले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी येथे घडलेल्या थरारक प्रसंगामधून मयुरेश शेळके यांनी चिमुकल्याचे प्राण वाचवल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. एक अंध महिला आपल्या लहान मुलाला घेऊन वांगणी स्थानकातून जात होती. याचवेळी या चिमुकल्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर कोसळला. याच दरम्यान, समोरुन उद्यान एक्स्प्रेस येत होती. यावेळी परिस्थितीचं भान राखत मयुरेश शेळके यांनी तात्काळ चिमुकल्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याचे प्राण वाचवले. एखाद्या चित्रपटातील सिनला देखील लाजवेल असे हे दृश्य सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले व सर्वांसमोर आले. मयुरेश याने दाखवलेले धाडस अचाटच आहे पण त्यात त्याने घडवलेले माणुसकीचे दर्शन दुर्मिळ होत चाललेय. सध्याच्या जगात कुणी ओळखीच्या, नात्यातल्या व्यक्तीच्या मदतीला देखील धावून जाताना दहादा विचार करतो मात्र मयुरेशने स्वतःच्या प्राणाची बाजी लावत एका अनोळखी लहानग्याला मानवतेचा दृष्टिकोन ठेवून वाचवले. मयुरेशने दाखवलेली ही संवेदशीलता आदर्शवत असून सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा