कोरोनामुक्तीसाठी लसीकरण महत्वाचे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
केंद्र सरकार नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने लसीकरण प्रक्रिया राबवत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 'कोविन' या ऑनलाईन अप्लिकेशनद्वारे पार पडत असल्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शी व लसीकरणातील सावळागोंधळ रोखणारी आहे. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धयांना लस दिली जात होती. त्यानंतर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील विविध व्याधींनी ग्रस्त व्यक्तींचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना व येत्या १ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे. टप्प्याटप्याने सर्वांनाच ही लस उपलब्ध होणार आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व नागरिकांचे लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. सद्यस्थितीत सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ह्या स्वदेशी लसी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत. मात्र दररोज कोट्यवधी लोकांना लस देण्यामुळे तसेच लसीच्या निर्यातीमुळे येत्या काळात लसीचा तुटवडा जाणवू लागणार ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. यामुळे लसीचा पुरवठा करण्यासाठी सज्ज असलेल्या इतर कंपन्यांनादेखील लसीकरणाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यामध्ये फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या काही कंपन्या लसीचे उत्पादन व पुरवठ्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. त्यांच्या लसीचे दर तुलनात्मकदृष्ट्या अधिक असले तरी देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठीच्या मोहिमेत त्यांची मदत क्रमप्राप्त ठरते. आज सरकारी लसीकरण केंद्रावर लस मोफत मिळते तर खाजगी केंद्रांवर लसीसाठी शुल्क मोजावे लागते. ह्या परदेशी कँपन्यांच्या लसीच्या किमती साधारणतः 1500 ते 2500 रुपयांपर्यंत आहेत ज्या निश्चित जास्त आहेत. मात्र ज्या घटकांना त्या परवडतील त्यांना त्या घेण्यासाठी मुभा देणे गरजेचे वाटते. त्यामुळे खुल्या बाजारात ह्या लसींच्या विक्रीसाठी परवानगी दिल्यास सरकारी भार काही प्रमाणात हलका होईल. कारण काही दिवसांत लस सर्वच घटकांसाठी उपलब्ध करणे सरकारला क्रमप्राप्त आहे. अशा वेळी लसीच्या तुटवड्याने तिचा काळाबाजार सुरू झाला तर तो रोखणे अवघड होऊन बसेल. यासाठी अधिकाधिक लस कम्पन्या व खाजगी लसीकरण केंद्रे उपलब्ध करणे आवश्यक आहे. लस बनवणाऱ्या ज्या कम्पन्या देशात लस पुरवठ्यासाठी इच्छुक व पात्र आहेत त्यांना आगामी काळात लसीकरणाच्या प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक आहे. लसीकरणाने येत्या काळात कोरोना व त्यामुळे होणारे मृत्यू नक्कीच नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक देशवासीयांचे लवकरात लवकर होणारे लसीकरण कोरोनामुक्तीच्या दिशेने मैलाचा दगड ठरणारे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment