ही तर सरळसरळ असंवेदनशीलताच की!

एकीकडे कोरोनासारख्या भयंकर महामारीने देश व राज्य होरपळून निघत असताना काही लोकांना आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांचे डोहाळे लागलेत. गेले वर्षभर उद्योग, व्यवसाय, नोकऱ्यांची वाताहत झाली आहे. मात्र तरीदेखील सोन्याची खाण समजली जाणारी आयपीएल स्पर्धा भरवण्याचा घाट घातला जातोय. क्रिकेटसारख्या खेळाला भारतीयांनी डोक्यावर घेऊन भरभरून प्रेम व पैसा दिला. क्रिकेटपटू, स्पर्धा आयोजक, माध्यम प्रायोजक क्रिकेटला मिळणाऱ्या टीआरपीतून प्रचंड माया जमा करतात. अवघा देश कोविडसारख्या महामारीचा मुकाबला करत असताना आयपीएलसारख्या खेळाडूंची बोली लावणाऱ्या क्रिकेट लिगकडून सामाजिक बांधिलकी जपत सढळ हस्ते मदत होणे गरजेचे आहे. यासाठी यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी लागणारा खर्च कोविड निर्मूलनासाठी वापरण्याचा निर्णय स्वागतार्ह ठरेल. मात्र पुन्हा एकदा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून भर कोरोनाच्या कहरात क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा उपद्व्याप असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे हे क्रिकेट सामने निदान महाराष्ट्रात तरी भरवले जाऊ नयेत. आयोजक व खेळाडूंनीदेखील आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून कोरोनाशी लढण्यासाठी औषधे, उपकरणे, पीपीई, मास्क, व्हेंटिलेटर्स यासारख्या साधनांच्या माध्यमातून आपापल्या परिसरातील कोविड संस्थांना सहकार्य केल्यास त्याचा लाभ कोविडविरुद्धच्या मोहिमेत नक्कीच होईल. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त