वाचकांना वैविध्य देणारे वृत्तपत्र
वृत्तपत्र काढणे व ते चालवणे म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. ते चालवताना वृतपत्र चालकांची होणारी दमछाक सर्वश्रुत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माध्यम क्षेत्राचा इतका विस्तार झालाय की वृत्तपत्र व्यवसाय त्यात झाकोळला गेला आहे. मुळात वृत्तपत्र क्षेत्र हे आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्यापेक्षा सामाजिक उत्क्रांतीचे साधन म्हणून पाहिले जाते. मात्र अनके वृत्तपत्रे पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी तग धरुन राहत नाहीत. त्यातच एखादे दैनिक नियमित स्वरुपात चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच. नवी मुंबईसारख्या एकविसाव्या शतकातील नगरीत नियमित प्रसारित होणा-या दैनिक नवे शहर हया वृत्तपत्राची वाटचाल गेल्या अनेक वर्षापासुन मी जवळुन बघत आलेलो आहे. मागील विसेक वर्षांपासून मी या वृत्तपत्राचा नियमित वाचक व अलिकडला लेखक आहे. साप्ताहिकाचे रूपांतर कालांतराने दैनिकात झाले व हे दैनिक आज दररोज ताज्या बातम्या, घडामोडी, ज्वलंत व दर्जेदार लेख घेऊन वाचकांची भूक भागवत आहे. खरेतर इतकी वर्षे एखादे वृत्तपत्र स्थानिक पातळीवर चालवणे कसरतच आहे. मात्र नवे शहर ने ही कसरत पूर्ण तर केलीच पण साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर करून पत्रकारीतेतील एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. राज्यभरातील अनेक मराठी वृत्तपत्रांना घरघर लागली असताना नवी मुंबईसारख्या हायटेक शहरात दिमाखात सुरू असणारे वृत्तपत्र म्हणजे नवे शहर. आजकाल दररोज मिळणारी बहुतांशी वृत्तपत्रे आपण उघडून पहिली तर कोणत्या तरी राजकीय पक्षास, विचारास, पंथास, धर्मास किंवा संस्थेस वाहिलेली असल्याचे आढळून येते. मात्र नवे शहर ने टिकवून ठेवलेला निपक्षपतीपणा व प्रामाणिकपणा काबिलेतरीफच आहे. अर्थात याचे संपूर्ण श्रेय या वृत्तपत्राचे मालक कैलाशचंद्र गिदोडिया, व त्यांच्या टीमला द्यायलाच हवे. दै नवे शहरचे संपादक श्री शैलेश जाधव व उपसंपादक श्री राजेंद्र घरत यांच्या संपर्कात मी गेल्या काही वर्षांपासुन आहे. वृत्तपत्र चालवण्यासाठी व नावारूपास आणण्यासाठी त्यांची सुरू असणारी धडपड आपल्या सहज लक्षात येते. नवोदित लेखकांना संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे मोठे कसब त्यांच्यात आहे. यामुळेच माझ्यासारख्या पत्रलेखकांसाठी 'वाचकांचे मत' हे सदरदेखील त्यांनी सन्मानपूर्वक नवे शहरमध्ये सुरू केले व टिकवून ठेवले आहे. याच वृत्तपत्रातून मला आरोग्य जनजागृती करण्यासाठी एक मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. मी ज्या आरोग्य क्षेत्रात काम करतो त्या विभागासाठी व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य योजना लोकांपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचवण्यासाठी सतत धडपडत असतो. नवे शहर मध्ये आरोग्य या विषयावर 'आरोग्यमंथन' मालिका सुरू करण्याची कल्पना व संधी या वृत्तपत्राने मला उपलब्ध करून दिली व आरोग्याच्या जवळपास सव्वाशे लेखांची मालिका याच वृत्तपत्रातुन प्रकाशित झाली. त्याबद्दल खरेतर मी वृत्तपत्राचे आभारच मानतो. नवे शहरच्या वाचकांना रोज स्टॉल वर उपलब्ध होणारे वर्तमानपत्र वेबसाईटवर देखील नियमित उपलब्ध होत असल्याने या वृत्तपत्राचे वाचक सातासमुद्रापार देखील नवे शहर वाचत असतील एव्हढे नक्की. सध्या तर उपसंपादक श्री राजेंद्र घरत यांच्या पुढाकाराने या वृत्तपत्राचे एक यु टयुब चॅनलदेखील सुरु झाले आहे ज्या माध्यमातुन समाजातील, प्रशासनातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती सातत्याने प्रदर्शित होत आहेत. यामुळे ज्ञानात व माहितीत मोठी भर पडत आहे. नवे शहर हे नवी मुंबईच्या जडणघडणीतील एक महत्वाचा दुवा असून सर्व स्तरांतील मान्यवरांनी त्याची वेळोवेळी पुष्टी केलेली आहे. दरवर्षी 1 मे रोजी आपला वर्धापन दिन सोहळा साजरा करत असताना कला, क्रीडा व शिक्षण क्षेत्रांतील विविध गुणवंताना सन्मानाने गौरवण्याची आपली परंपरा नवे शहरने कायम ठेवली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासुन वर्धापन दिन साजरा करता आलेला नसला तरी कोविड कालखंडामध्येदेखील नवे शहर अविरतपणे सुरुच राहिले व नवी मुंबईतील वाचकांची वाचनभूक भागवत राहिले याचा अभिमान या वृत्तपत्राचा वाचक, लेखक म्हणून मला नक्कीच आहे. त्यामुळे नवी मुंबईत दररोज घडणाऱ्या विविध घडामोडींचे सांगोपांग अस्तित्व दाखवणारे नवे शहर हे वृत्तपत्र उत्तरोत्तर बहरत जावो व अखंडीतपणे लोकांचे ज्ञान प्रज्वलित करत राहो हीच या निमित्ताने अपेक्षा. वर्धापन दिनानिमित्त नवे शहरचे सर्व वार्ताहर, डीटीपी ऑपरेटर, संगणक चालक, कर्मचारी वर्ग, संपादक, उपसंपादक, मालक व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा ! काळजी घ्या, मास्क वापरा, सुरक्षित राहा !
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment