भावासारखा मित्र

भावासारखा जिगरी मित्र 

https://vaibhavmohanpatil.blogspot.com/2021/05/blog-post_11.html?m=1

*भावासारखा असा  मित्र पुन्‍हा होणे नाही*

स्‍वप्‍नातदेखील वाटले नव्‍हते इतकी महाभयंकर महामारी सध्‍या कोरोनामुळे सुरु आहे. दूरवर दिसणारा कोरोना आता घराघरात येवून पोहोचला आहे. दोन महिन्‍यांपूर्वी कोरोनाच्‍या कमी झालेल्‍या भितीने लोकांना गाफील ठेवले व आज हाच कोरोना अनेक घरे उध्‍वस्‍थ करु लागलाय. मागच्‍या वर्षी मार्च महिन्‍यापासुन सुरु झालेली कोरोनाची पहिली लाट डिसेंबर अखेर ओसरतेय अशी शक्‍यता वाटत असतानाच या वर्षी पून्‍हा दुसरी लाट इतक्‍या जोरात आली की आरोग्‍य यंत्रणा अपु-या पडायला लागल्‍या. पेशन्‍टना बेड मिळत नाही, ऑक्‍सीजन नाही, व्‍हेंटीलेटर्स मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही अशी विदारक अवस्‍था मागच्‍या महिन्‍यात होती. यामुळे मिळेल तशी व मिळेल तिथून मदत घेण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न करताना लोक सर्वत्र दिसत होते. यादरम्‍यान अनेकांचे फोन येत होते, अजुनही येत आहेत. कुणाला अॅडमिट व्‍हायचे आहे, ऑक्‍सीजन बेड हवा आहे,आयसीयू बेड पाहिजे, कुणाला इंजेक्‍शन हवे आहे तर कुणाला लस हवी आहे. जमेल तशी व तितकी मदत करण्‍याचे आटोकाट प्रयत्‍न यादरम्यान केले. त्‍यातील अनेकजण बरे होऊन सुखरुप आपापल्‍या घरी परतले, कुणी अजुनही उपचार घेताहेत. मात्र सर्वात जास्‍त दुःख तेव्‍हा झाले जेव्‍हा कोरोनाने पकडलेल्‍या व्‍यक्‍ती अथक प्रयत्नानंतरदेखील आपल्‍यातुन निघून गेल्‍या व त्याकडे हतबल होऊन पाहण्‍यापलीकडे काही गत्यंतर नव्हते. नात्यातल्या, ओळखीतल्या, जवळच्या अनेक व्यक्ती गेल्या वर्षीपासून या कोरोनाने हिरावून घेतल्या. कोरोना माजवत असलेला हाहाकार पाहता पुढे आणखी कायकाय वाढून ठेवलेय माहीत नाही. नात्‍याने नसला तरी मनाने ज्‍याला मी भाऊ मानले होते, आयुष्‍याची सुरुवात मी ज्‍याच्‍याबरोबर केली तो माझा बालपणीचा जिगरी यार, मित्र, दोस्‍त योगेश उर्फ बाबू याने आम्‍हा सर्वांना फसवून जेव्‍हा जगाचा निरोप घेतला तेव्‍हा मात्र पूर्णतः खचल्‍यासारखे झाले व प्रयत्नांवरचा विश्वासच उडाला. मागच्‍या महिन्‍यात त्‍याला कोरोनाची लागण झाल्‍यानंतर खालावत चाललेली त्‍याची तब्‍येत अथक प्रयत्‍न करुनदेखील ना डॉक्‍टर सुधारु शकले ना आमचे प्रयत्न. सुरुवातीला कोविडची लक्षणे दिसायला लागल्‍यानंतर लक्षणे सौम्‍य स्‍वरुपाची असल्‍यामुळे काही दिवस घरातच उपचार सुरु होते. बाहेरची परिस्‍थीती वर वर्णन केल्‍याप्रमाणे अत्‍यंत भितीदायक. त्‍यात २३ तारखेला आरटीपीसीआर अहवाल पॉझीटीव्‍ह आला. त्‍याआधीपासुन काही दिवस मोबाईलवर मी त्‍याच्‍या संपर्कात होतोच. ज्‍या दिवशी रिपोर्ट आला त्‍या दिवशी त्‍याला काहीसा दम लागण्‍याचा त्रासदेखील सुरु झालेला. त्‍यामुळे लगेच आम्‍ही त्‍याला रुग्‍णालयात दाखल करण्‍याचा निर्णय घेतला व वाशीच्‍या सिडको एक्‍झीबिशन कोविड सेंटरमध्‍ये ऑक्‍सीजन बेड उपलब्‍ध केला. सुरुवातीला दोन दिवस ऑक्‍सीजन लावलेला असला तरी त्‍याची प्रकृती स्‍थीर होती. तिस-या दिवशी मात्र त्‍याला अधिक त्रास होऊ लागल्‍याने ऑक्‍सीजनच्‍या पुढची स्‍टेप बायपॅक (एनआयव्ही) मशीनवर त्याला स्‍थलांतरीत करण्‍यात आले. ९५-९६ च्‍या घरात असलेली ऑक्‍सीजन लेव्‍हल पुढचे ३ दिवस कायम राहीली. या दरम्‍यान त्‍याच्‍याकडे असलेल्‍या फोनवर मधेमधे जमेल तसा बोलण्‍याचा व त्‍याच्‍याकडून तब्‍येत जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करत होतो. २९ तारखेला मात्र त्‍याची प्रकृती व ऑक्‍सीजन लेव्‍हल आणखी खालावत असल्‍याचे लक्षात आल्‍यावर डॉक्‍टरांकडून अधिक माहिती घेतली व त्‍याला आता पुढची स्‍टेप म्‍हणजे व्‍हेंटीलेटरची गरज भासणार असल्‍याचे लक्षात आले. व्‍हेंटीलेटरची व्‍यवस्‍था तिथे उपलब्‍ध नसल्‍याने डॉक्‍टरांनी तातडीने त्‍याला कामोठे येथील एमजीएम रुग्‍णालयात हलवण्‍याची तयारी सुरु केली व २९ एप्रिल रोजी संध्‍याकाळी बाबूला एमजीएमच्‍या आयसीयूत भरती केले. तिथेदेखील दोन दिवस केवळ बायपॅक मशीनवर ठेवण्‍यात आले ज्‍यावर ऑक्‍सीजन लेव्‍हल ९०च्‍या पुढेच कायम होती. त्‍यामुळे फार चिंतेचे कारण नव्‍हते. वाशीच्‍या कोविड सेंटर व एमजीएममध्‍ये मिळून रेमडेसिवीर इंजेक्शनचे सर्व डोस, कोविड प्रोटोकॉलनुसार अॅंटीबायोटिक व इतर इंजेक्‍शने असे सर्व प्रकारचे उपचार सुरुच होते. मात्र न दिसणारा संसर्ग शरीरातील अवयवांना बाधित करत होता. ३ तारखेला त्‍याने जेवण बंद करुन फक्‍त पातळ पदार्थच खायला सुरु केले तेव्‍हा मात्र काळजी वाटायला लागली. त्‍याला लावलेले बायपॅक मशीन हे व्‍हेंटीलेटरच्‍या प्रेशरने सुरु असल्‍याचे कळले. शनिवारी ८ तारखेला जेव्‍हा ऑक्‍सीजन लेव्‍हल एकदम ७० च्‍या घरात गेली व त्‍याला पूर्णपणे व्‍हेंटीलेटरवर टाकण्‍यात आले तेव्‍हा सकाळीच उठून समीरला घेऊन हॉस्‍पीटल गाठले. तेथील डॉक्‍टरांना भेटुन वस्‍तूस्थिती जाणून घेतली. त्‍यावेळी त्‍याची ऑक्‍सीजन पातळी कमी होऊन प्रकृती अधिक ढासळू नये म्‍हणून इनक्‍यूबेट/पॅरालाईज्‍ड करुन व्‍हेंटीलेटरवर ठेवण्‍यात आल्‍याचे सांगीतले व पुढचे किमान ४८ तास अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचेदेखील त्‍यांनी सांगीतले. फुफुसामधील वाढत्‍या संसर्गामुळे त्‍याची प्रकृती धोक्‍याच्‍या खाली नव्‍हतीच हे ऐव्‍हाना आमच्‍या लक्षात आले. त्‍यावेळी इतर रुग्‍णालयात हलवणे, आणखी पुढची ट्रीटमेंट सुरु करणे या पर्यायांचादेखील विचार केला. मात्र कोविड रुग्‍णाला भारतभर एकाच प्रोटोकॉलनुसार उपचार करण्‍यात येत असल्‍यामुळे दुस-या रुग्‍णालयाकडूनदेखील अन्‍य प्रकारच्‍या उपचारांची अपेक्षा नव्‍हती जी इथे सुरु होती. शिवाय व्हेंटिलेटरवरचा पेशंट शिफ्ट करताना धोका होताच. त्‍यात त्‍याला बरे करण्‍यासाठी डॉक्‍टरांची धावपळ, आवश्‍यक ती सर्व प्रकारची औषधे, उपकरणे उपलब्‍ध करुन देण्‍यात येत होती. डॉक्‍टरांचे सुरु असलेले शर्थीचे प्रयत्‍न अखेर अपुरे पडू लागल्‍याचे आम्‍हाला तेव्‍हा लक्षात आले जेव्‍हा शनिवारी रात्री त्‍याचे हृदय बंद पडल्‍याचे डॉक्‍टरांनी फोनवर कळवले. शनिवारच्‍या रात्रीत दोनदा हाच प्रकार घडला मात्र सीपीआर म्‍हणजे ह्रदय पंपीग करुन त्‍यातून त्‍याला बाहेर काढण्‍यात आले. रविवारी सकाळी पुन्‍हा ९ वाजता दाब वाढल्‍याने हृदयक्रिया बंद पडली व त्‍यातून बाहेर पडता न आल्‍याने दहाच्‍या सुमारास बाबूचा श्‍वास थांबल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहिर केले. आदल्‍या दिवशी व्‍हेंटीलेटरच्‍या ताब्‍यात गेलेला बाबू रविवारी त्‍यातून बाहेर पडला तो कायमचाच. आमच्‍यासाठी अनपेक्षित अशी ‘ती’ बातमी ऐकून पायाखालची जमीनच  सरकली व डोळयासमोरुन पून्‍हा एकदा त्याच्‍यासोबतचा संपूर्ण जीवनपट तरळून गेला. बाबू आपल्‍यात राहीला नसल्‍याची जाणीव केवळ अविश्‍वसनीयच नव्‍हती तर मोठा मानसिक धक्‍का देणारी होती. आपल्याला जडलेल्या आजाराशी तो गेली १७ दिवस रुग्णालयात अत्यंत निकराने लढला. गेले कित्‍येक दिवस त्‍याच्‍या सुखरुप घरी परतण्‍यासाठी प्रार्थना व प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करणा-या त्‍याच्‍या भावाची, पत्‍नीची, कुटुंबियांची अवस्‍था तर अत्‍यंत दयनीय होती. तशाही परिस्‍थीतीत त्‍यांना सावरत रुग्‍णालयीन व कोविडचे सोपस्‍कार पार पाडत मोजक्‍या नातलगांच्‍या उपस्थितीत त्‍याचेवर घणसोली येथील स्‍मशानभुमीत अंत्‍यसंस्‍कार केले. मात्र बाबुच्‍या रुपात आपल्‍या घरातला, हक्‍काचा व मनात प्रचंड आदरभाव जपलेला मित्र गमावल्‍याचे दुःख पचवणे खूप अवघड झाले आहे. बालपण, त्‍यानंतर शालेय जिवन व त्‍यानंतर करिअरची सुरुवात एकाच ठिकाणी, सोबतीने करणारे आम्‍ही एकमेकांसाठी अत्‍यंत जिवलग असेच होतो. एकमेकांबददल आमच्‍या दोघांच्‍या मनातील भावना शब्‍दांत वर्णन होऊच शकत नाहीत. सुखदुखाच्‍या प्रसंगी एकमेकांना आधार देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही नेहमीच करायचो. गावी असो कि नवी मुंबईत, एकमेकांशी दोन तीन दिवसांपेक्षा अधिकचा काळ भेटल्‍याशिवाय, बोलल्‍याशिवाय आम्‍हाला राहवत नव्‍हते. घरातील एखाद्या नव्या वस्‍तूची खरेदी असो कि दुरुस्‍ती असो की एखादे कार्य सर्व गोष्‍टीत तो सोबत असायचा. नवी मुंबईत येऊन आपल्या अथक परिश्रमाने व कष्टाने त्याने आपला प्रापंचिक व व्यावसायिक डोलारा उभा केला होता. आपल्या कामाशी, मैत्रीशी व नात्यांशी अत्यंत प्रामाणिक राहून त्याने सर्वच पातळ्यांवर यश मिळवले. बाबूच्‍या रुपात एक अत्‍यंत जवळचा मित्र आज मी गमावला आहे. त्‍याची भरपाई कधीच होऊच शकणार नाही. अत्‍यंत मितभाषी, हसतमुख, सर्वांना जमेल तशी मदत करणारा, सर्वांशी आदराने व विनम्रतेने वागणारा बाबू आज आपल्‍यात नाही यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. आयुष्‍याच्‍या अखेरपर्यंत त्‍याच्‍या जवळ राहिलो. मात्र या असाध्‍य व दुर्धर आजारातुन आपला मित्र आपल्‍याला बाहेर काढेल अशी दुर्दम्य आशा ठेवणा-या बाबूची ही इच्‍छा हतबलतेमुळे पूर्ण करता न आल्‍याची सल मनात आयुष्‍यभर राहील. तब्‍बल १५-२० दिवसांच्‍या अथक प्रयत्‍नानंतरदेखील रोज थोडा थोडा करुन आम्‍हाला फसवून तो आमच्‍या समोर कायमचा जात होता याचे शल्‍य मनाला बोचत राहील. छोटयामोठया गोष्‍टींतदेखील सतत पाठीशी उभा राहणारा असा मित्र पुन्‍हा होणे नाही. माझेपेक्षा कित्‍येक पटीने अधिकचे दुःख पचवण्‍याची शक्‍ती त्‍याच्‍या कुटुंबियांना व नातलगांना ईश्‍वर प्रदान करो हीच देवाचरणी प्रार्थना.

वैभव                                

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त