गर्दीवर नियंत्रण गरजेचे

राज्‍यातील कोरोना रुग्‍णांची संख्‍या हळूहळू कमी होत असल्‍याचे दिलासादायक चित्र सध्‍या दिसत आहे. मात्र मागील वर्षी आलेली कोरोनाची पहिली लाट ओसरल्‍यानंतर आलेला गाफीलपणा पुन्‍हा दाखवून परवडणारे नाही. त्‍यामुळे येत्‍या काही दिवसांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सर्व दैनंदिन व्‍यवहार सुरु होणार असले तरी त्‍यात उताविळपणा व अतिआत्‍मविश्‍वासपणा  महागात पडू शकतो. मागील वर्षीची कोरोना लाट वर्षअखेर ओसरल्‍यानंतर सर्व प्रकारचे दैनंदिन व्‍यवहार व जनजिवन नियमितपणे सुरु झाले. मात्र यामध्‍ये लोकांच्‍या व यंत्रणांच्‍या गाफिलपणाची मोठी किंमत कोरोनामुळे हजारो जिव गमावून चुकवावी लागली. त्‍यातून बोध घेत यावेळी प्रशासनाने तिस-या लाटेसाठी जोरदार प्रतिबंधात्‍मक तयारी केलेली असली तरी त्‍यासाठी लोकांची साथदेखील महत्‍वाची ठरणार आहे. ओसंडून वाहणा-या बाजारपेठा व रेल्‍वेगाडया हे चित्र कायमस्‍वरुपी बदलावे लागणार आहे. सर्वसामान्‍यांसाठी लोकलसेवा सुरु झाल्‍यावर पुन्‍हा एकदा गर्दीचे लोंढे रेल्‍वेगाडयांमध्‍ये दिसणार आहेत. मुंबई उपनगरीय लोकलवाहतूक हे गर्दीचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. कोरोनाच्‍या आतापर्यंतच्‍या आलेल्‍या दोन्‍ही लाटांचा उगम व विस्‍तार याच रेल्‍वेवाहतुकीतून झाल्‍याचे एव्‍हाना स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे रेल्‍वे वाहतूक पून्‍हा एकदा सर्वसामान्‍य प्रवाशांसाठी खुली करताना  शासन फार सावधगीरीने पावले टाकत आहे. लाखोंच्‍या संख्‍येने प्रवास करणा-या नोकरदारांना रेल्‍वेसेवेचा मोठा आधार असला तरी गेल्‍या कित्‍येक वर्षांत उपनगरीय रेल्‍वेवाहतूकीला पर्याय उपलब्‍ध होत नाही हे दुर्दैव आहे. लोकलमधील हीच भरमसाठ गर्दी सध्‍या संसर्गाला कारणीभूत ठरत आहे. मुंबई शहरातील काही शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये उपनगरांमध्‍ये स्‍थलांतरीत केली गेल्‍यास मुंबईकडे धावणारी बरीचशी गर्दी विभागली जाईल व त्‍याचा अधिक भार लोकलसेवेवर येणार नाही. एकंदरीत, कोरोनाच्‍या संभाव्‍य लाटा रोखण्‍यासाठी गर्दीला आवर घालणे अत्‍यावश्‍यक असुन त्‍यासाठी सर्वतोपरी उपाययोजना युध्‍दपातळीवर करणे गरजेचे आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई    


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त