लसीकरण केंद्रे कोरोनाचे हॉटस्पॉट बनू नयेत

सध्या सर्वच कोविड लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कोविन अप्लिकेशनद्वारे स्वयंनोंदणीची व्यवस्था आहे मात्र अनेक लाभार्थी लसीकरण केंद्रांवरच नोंदणी करणे पसंद करतात. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया लांबते व त्याचे पर्यावसन गर्दीत होत आहे. लसीकरण केंद्रांबाहेर लागलेल्या लांबलचक रांगा कोविड नियमांचे सर्रास उल्लंन्घन करणाऱ्या आहेत. सुरुवातीच्या काळात लसीकरणाच्या बाबत असलेली उदासीनता कोरोनाचा वाढता कहर पाहून संपुष्टात आलेली असून आता लोक स्वतःहुन लसीकरणासाठी उत्साह दाखवत आहेत. कोविड निर्मूलन मोहिमेतील लसीकरण हा एक महत्वाचा टप्पा असून लसीकरणासाठी लोकांचा हा उत्साह नक्कीच दिलासादायक आहे. मात्र त्यासाठी  उसळून येत असलेली गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. त्यासाठी घाई गर्दी जीवावर बेतणारी ठरू शकते. लसीकरणाची राज्यातील गती पाहता सर्व नागरिकांना लस घेण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागेल अशीही स्थिती नाही. मुबलक प्रमाणात लसदेखील उपलब्ध होत असल्यामुळे भविष्यात तिचा तुटवडा निर्माण होईल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे लोकांनी थोडा संयम दाखवावा, उतावीळपणाने कोरोना संसर्गाला पूरक वातावरण निर्माण करू नये. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर उसळणारी ही गर्दी लसीकरण केंद्रे कोरोनाचे हॉटस्पॉट बनू नयेत म्हणजे झाले.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त