प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोविड काळात आपल्यादेखील आजूबाजूची, नात्यातली, ओळखीची, अनोळखी, न भेटलेली पण परिचित अशा अनेक व्यक्ती अवकाळी आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्याबद्दलचे दुःख तर मनात आहेच मात्र ते मनात साठवण्यासाठी वेळदेखील मिळाला नाही एव्हढे मृत्यूतांडव अजूनदेखील सुरू आहे. येत्या काळात आणखी काय आपल्यासमोर वाढून ठेवलेय याची काणकुण कुणालाच नसेल. एखादा जवळचा नातलग गेल्याचे दुःख जेव्हढे आहे तेव्हढेच दुःख, हळहळ आपल्याला ओळखीतली एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यावर होते. कोरोनाने केलेली हानी न भरून येणारी आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्याने बाधित केले आहे. पण मृत्यूची वेळ कुणावरही न ओढवो असे मात्र मनोमन वाटते. प्रत्येकाला जमेल, झेपेल तशी मदत करण्याचा प्रयत्न आपण करतो. मात्र वैद्यकीय गुंतागुंत व ईश्वर सत्तेपुढे बऱ्याचदा इलाज नसतो. गेल्या वर्षी कोरोनाकाळात विविध आजारपणांनी जवळच्या व ओळखीतल्या अनेक नातलगांनी निरोप घेतला. त्यातील अनेक कुटुंबियांच्या सांत्वनालादेखील जाता आले नाही इतकी विदारक परिस्थिती होती. मात्र यामुळे त्यांच्या जाण्याचे दुःख कमी होत नाही. यामुळे जितके दुःख होते तितकी काळजीदेखील वाटायला लागते. हा काळ काही दिवसांनी वा महिन्यांनी सरणारच आहे. मात्र तोवर सर्वांनी आपापल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग फार वेगाने पसरतो आहे, या संसर्गात कोरोना सोडून इतर आजारांच्या रुग्णांना होणारा त्रास जीवावर बेतणारा आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना आपल्यातले इतर आजार बळावणार नाहीत याचीदेखील काळजी सर्वांना घ्यावीच लागणार आहे. माणसाची किंमत जिवंतपणी नाही मेल्यावर कळते असे म्हणतात व ते खरेच आहे. त्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या, जीव लावणाऱ्या माणसांची फिकीर असायलाच हवी. त्यांना होणारा त्रास त्यांची काळजी वाढवणारा व आयुष्य कमी करणारा असू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. शेवटी 'जान है तो जहाँन है' ! सण, उत्सव, सोहळे, कार्ये करण्यासाठी आयुष्य पडलेय हो!
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment