आश्वासक लसधोरण

केंद्र सरकारने जानेवारी पासून देशभर लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात पुरेशा जागृतीअभावी लसीकरण वेग मंदावला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर लसीकरणाचे महत्व देशवासीयांच्या लक्षात आले व लसीसाठी प्रचंड झुंबड पाहायला मिळाली. केंद्राने अत्यंत नियोजनबद्धरित्या लसवितरण सुरू केल्याने एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया व्यवस्थित सुरू होती. कोविन अँपद्वारे लसीकरण प्रक्रिया नियंत्रित होत असल्यामुळे नागरिकांनीच्यादेखील ती पसंतीस उतरली. मात्र मे महिन्यात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यावर मात्र सर्वत्र लसीचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला. कारण देशात सर्वाधिक लोकसंख्या याच वयोगटातील आहे. यामुळे काही राज्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने २५ टक्के लस उपलब्ध करून घेण्याचे अधिकार राज्यांना दिले. मात्र हा फॉर्म्युला फार कामी न आल्याने आता पुन्हा एकदा केंद्राने लसीकरणाची संपूर्ण सूत्रे हाती घेतली आहेत. जवळपास ४४ कोटी लसींचे आदेशदेखील केंद्र सरकारने सिरम व भारत बायोटेक या देशातील प्रमुख उत्पादक कंपन्यांना देऊन अग्रीम रक्कम अदा करण्याचीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लसीकरण मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार आहे. केंद्रांचे बदललेले हे लसधोरण नक्कीच स्वागतार्ह आहे. लसीकरण मोहिमेतील केंद्र सरकारने आखलेले टप्पे, लस पुरवठा, खाजगी लसीकरण केंद्रांना मान्यतेची प्रक्रिया, त्यांचेसाठीची नियमावली, मार्गदर्शक सूचना हा सूत्रबद्ध लसीकरण प्रक्रियेचा भाग होता. भारतासारख्या मोठ्या जनसंख्येच्या देशात १०० टक्के लसीकरणाची प्रक्रिया राबवणे सोपे नक्कीच नाही. त्यासाठी उत्पादन व पुरवठा यांचा योग्य मेळ व वेळ साधणे गरजेचे आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव जालीम उपाय सध्या उपलब्ध असल्यामुळे लवकरात लवकर देशातील सर्व जनतेचे लसीकरण देशाला कोरोनामुक्तीकडे घेऊन जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने सध्या बदललेले लसधोरण नक्कीच आश्वासक असून डिसेंबरपर्यंत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण विनासायास पूर्ण होईल अशी अपेक्षा करू या. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त