रक्तदान श्रेष्ठ दान
- Get link
- X
- Other Apps
दरवर्षी १४ जून हा जागतिक रक्तादाता दिन म्हणून साजरा केला जातो. आज विविध आजारांवर किंवा अपघाती स्थितीत बहुतांश रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्त हा मानवाच्या शरीरातील व आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक वास्तव आहे. हयामुळेच अपघातामुळे, आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुस-या व्यक्तीकडुनच घ्यावे लागते आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर मानवी जिवनात रक्तदानाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. रक्ताची निर्मिती कोणत्याही कारखान्यात होत नसते. रक्तदानातूनच रक्ताची गरज पूर्ण होत असते. त्यामुळेच रक्तादाता हा इतरांचा जिव वाचवणारा दूत म्हणूनच ओळखला जातो. कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना पेशंटांना, थॅलिसिमिया आजाराने ग्रस्त बालके आणि तीव्र अनिमिया असलेल्या पेशंटांना देखील रक्ताची नियमित आवश्यकता असते. रक्तदानामुळे गरजवंत रुग्णांचे प्राण वाचवता येतात. तसेच ज्या समाजात आपण राहतो त्याचं ऋण फ़ेडायचीही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवुन देते. खर तर हया दानामुळे आपल काहीच कमी होत नाही कारण आपल्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्त वाहत असते. रक्तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्त घेतले जाते. पुढील २४ ते ४८ तासात त्याचीही भरपाई शरीरात होते. रक्तदानामुळे आपल्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते त्यामुळे बरेचसे आजार पहिल्याच पायरीवर कळण्यास मदतही होते. गेल्या वर्षभरापासुन सुरु असलेल्या कोविड 19 साथीच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाचे प्रमाण ब-याच अंशी घटलेले होते. त्यामुळे महाराष्ट्रात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला होता. मात्र दरम्यानच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, खाजगी व शासकीय वैदयकीय संस्था यांच्या माध्यमातुन रक्तदानासाठी मोठमोठी शिबीरे भरवली गेली व त्यामुळे रक्ताची निर्माण झालेली तुट काही प्रमाणात भरुन निघण्यास मदत झाली. रक्ताच्या कमतरतेमुळे मानवी शरीरात निर्माण होणा-या व्याधी जिवघेण्यादेखील ठरु शकतात. त्यामुळे रक्तदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यायला हवे. रक्तदानाबरोबरच लोकांमध्ये नेत्रदान, त्वचादान, देहदान या प्राण वाचवणा-या दानासंबधीही जागृती व्हायला हवी.
१८ ते ६० वयोगटातील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते. त्याचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे लागते. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असावे. उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्या तासापर्यंत रक्तदान करता येत नाही.
वाजवी शुल्कामध्ये रक्त व रक्त घटकांची उपलबद्धता गरजू लाभार्थ्यांना करून देण्याच्या उददेशाने महाराष्ट्रामध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद कार्यान्वित असुन गेल्या अनेक वर्षांपासून या परिषदेने सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवल्यामुळे तसेच अनेक संस्थाच्या पुढाकाराने रक्तदानाचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची ऐनवेळी होणारी धावपळ थांबवण्यासाठी ब्लड ऑन कॉल ही योजना जानेवारी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार गरजू रुग्णांचे नातेवाईक १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून रक्त मिळवू शकतात. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रक्तपेढय़ांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य रक्त संक्रमण समिती पार पाडते. राज्यात रक्तदात्यांचे प्रमाण वाढावे याकरिता समितीतर्फे वर्षभर विविध शाळा-कॉलेजांमध्ये रक्तदान शिबीर भरवण्यात येते. याशिवाय निबंध स्पर्धा, जाहिराती, चर्चासत्र यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. रक्तपिशव्यांसाठी शासनाने दर ठरवून दिलेले असून त्यापेक्षा अधिक दराने रक्तपिशवीची विक्री केल्यास त्या खासगी रक्तपेढीची मान्यता रद्द होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार एकूण लोकसंख्येच्या १ टक्के रक्तसंकलन होणे आवश्यक आहे. मुंबईत हे प्रमाण १ टक्क्यांहून अधिक आहे. रक्तदात्यांचे आणि शिबीर आयोजकांचे आभार मानण्यासाठी तसेच नवीन रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी २००४ सालापासून दरवर्षी १४ जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. मुबलक रक्तसाठा रक्तपेढीत तेव्हाच उपलब्ध होऊ शकतो जेव्हा रक्तदाते स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घेतील. रस्ते अपघात, रक्ताचे विकार, प्रसूती, नैसर्गिक व मानवी आपत्ती अशा परिस्थितीत मोठय़ा प्रमाणात रक्ताची गरज असते. रक्तदान हे श्रेष्ठ दान असुन या दानोने अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment