भ्रष्टाचाराची कीड ठेचलीच पाहिजे
भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोरोना किंवा इतर कुठल्याही आपत्तीचे सोयरसुतक नसते. असे भ्रष्टाचारी शॉर्टकट धन मिळवण्याच्या मोहात कुठल्याही मार्गाने आपला 'कार्यभाग' साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र भ्रष्टाचाराला चालना देणारे लोकदेखील त्याला तितकेच जबाबदार ठरतात. एखादे काम नियमात वा कायद्यात बसत नसेल तर गैर मार्गाने करून घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढती आहे. हे लोकच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराला चालना देतात. त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकारी -कर्मचाऱ्याला मोकळीक मिळत असल्याने त्याची हिंमतदेखील वाढते. मात्र याचा सर्वात मोठा फटका किरकोळ कामे करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भ्रष्टाचाराची कीड मुळापासून उपटून काढण्यासाठी सर्व स्तरांतील घटकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या कामासाठी जाणीवपूर्वक व विनाकारण अडवणूक होत असेल तर लाच देऊन ते काम करून घेण्याऐवजी तात्काळ वरिष्ठांना किंवा लाचप्रतिबंधक विभागाला कळवण्याची खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी. तसेच यासाठी व्यापक प्रसिद्धी मोहीम माध्यमे व शासनाने राबवणेदेखील तितकेच गरजेचे आहे. यासाठी मोठ्या जनजागृतीची गरज आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे व नागरिक एकत्रितरित्या लाचखोरी व भ्रष्टाचाराची असाध्य कीड ठेचून काढू शकतात.
वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment