टीव्ही वाहिन्यांनी लोकांना डिवचू नये
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे म्हणजे इंडियन आयडल. हा कार्यक्रम वारंवार निरनिराळ्या कारणांमुळे वादात सापडत आहे. वास्तविक देशाच्या विविध भागांतील हरहुन्नरी कलाकारांना प्रोत्साहित करणारा हा कार्यक्रम मनोरंजनाबरोबरच तरुणांसाठी नक्कीच मार्गदर्शक आहे. मात्र टीव्ही वाहिनी व कार्यक्रम चालकांच्या चुकीच्या धोरणांमुळे वारंवार या कार्यक्रमाची दिशा भरकटत आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने अलिबाग शहराबद्दल कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त विधान केलं. यामुळे तो वादात सापडला. आदित्यने ‘इंडियन आयडलच्या 12 व्या पर्वातील एपिसोडमध्ये स्पर्धकाशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. "राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या" असं आदित्य म्हणाला व यावरून बराच हल्लकल्लोळ माजला. याबद्दल आदित्यने जाहीर माफी मागितली असली तरी मूळ अलिबागकरांच्या भावना दुखावणारे हे वक्तव्य या आधीदेखील अनेकदा वादग्रस्त ठरले आहे. टीव्हीवरील एखाद्या लोकप्रिय कार्यक्रमात त्याची वाच्यता होत असेल तर ते नक्कीच उचित नाही. या वाक्यामधून अलिबागकरांना निरक्षर दाखवण्याचा हेतू असून हे वाक्य टीव्ही वाहिन्यांनी कार्यक्रमांमध्ये कलाकाराने अनावधानाने म्हटले तरी ते वगळणे उचित ठरेल. टीआरपी साठी मालिकांमधून नको त्या गोष्टी प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांनी महाराष्ट्रातील शहरांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये दाखवून लोकांना डिवचू नये.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment