सर्वसमावेशकता जपायला हवी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
'हट्ट'योग हे संपादकीय (दै लोकसत्ता दिनांक ३ जून) वाचले. बिगर भाजप सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या अक्रोशाचा पुढील अंक पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला. पंतप्रधानांच्या दौऱ्यात प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलावून घेण्याचा अट्टाहास हा एक प्रकारचा हट्टच म्हणावा लागेल. बंडोपाध्याय या मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली असताना केवळ पंतप्रधानांसमोर वेळेत हजर झाले नाहीत म्हणून त्यांची थेट दिल्लीदरबारी बदली करणे म्हणजे सरकारी व्यवस्थेचा राजकीय वापर नाही तर दुसरे काय म्हणावे ! ममता दीदी व भाजप संघर्ष काही दिवसांपूर्वी अवघ्या देशाने पाहिला. त्यात ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने निर्विवाद बाजी मारली. मात्र त्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकार तृणमूलच्या नेत्यांना अडचणीत आणत असल्याचे आरोपदेखील झाले. सध्या पश्चिम बंगाल सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये विस्तवदेखील जात नाही. इकडे महाराष्ट्रासह बिगर भाजप राज्यांमध्येदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना घेऊन राजकीय वातावरण तप्त आहे आणि आता पश्चिम बंगालमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजकीय वादात बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न होतोय. पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या कथित अपमानास्पद प्रकारानंतर मुख्य सचिवांना केंद्राने दिल्लीत सेवा बजावण्यास बोलावून तर घेतले पण मुख्यमंत्री ममतांनी पुढची खेळी करत तात्काळ मुख्य सचिवांना निवृत्त केले व मुख्यमंत्री कार्यालयाचे सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारवर कुरघोडी केली. आता याला भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हटला जात असेल तर भाजपने केंद्र सरकारच्या आडून काय काय सुरू ठेवले आहे हे वेगळ्याने सांगायला नको. वास्तविक ही परिस्थिती लोकशाही तत्वांवर चालणाऱ्या देशासाठी पूरक नाही. राज्यांच्या सहकार्याशिवाय केंद्र सरकार देशाचा गाडा विनासायास हाकूच शकत नाही. केंद्रातील राज्यकर्त्यांना एव्हाना या गोष्टीचे भान यायला हवे होते. मात्र तसे होताना दिसत नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपेतर पक्षांची सत्ता आहे तिथे सत्ताधाऱ्यांचे साम, दाम, दंड, भेद वापरून त्यांचे राजकीय, मानसिक, आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे प्रकार दूषित मनोवृत्तीतुन सुरू आहेत. देशाच्या पंतप्रधानांची प्रतिमा व प्रतिष्ठा जपायची असेल देशाचा प्रधानसेवक म्हणून त्यांनी सर्वसमावेशक भावनेतून संशयाला जागा निर्माण न होऊ देता देशाचा गाडा हाकायला हवा. कारण "ये पब्लिक है, सब जानती है!" एव्हढे ध्यानात असू द्या.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment