शाळा सुरू करण्याचा प्रायोगिक प्रयत्न व्हावा
- Get link
- X
- Other Apps
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने देशात शिरकाव केल्याने मंदावलेले जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. संसर्गाच्या धोक्यामुळे गर्दीवर मर्यादा आल्या. याचा सर्वात मोठा फटका शैक्षणिक जगताला बसला. मागील एक वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा अजूनही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मागील मार्चमध्ये भर परीक्षांच्या हंगामात कोरोना महामारीस सुरुवात झाल्याने सर्वच इयत्तांच्या सन २०१९-२० च्या अंतिम परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष सुरूच होऊ शकले नाही व अखेर या वर्षातील देखील कोणत्याही परीक्षा न झाल्याने मूल्यमापनाविनाच चालू वर्षदेखील वाया गेले. आधीच ऑनलाईन शिक्षणातील अनेक अडचणी, त्रुटींमुळे ही शिक्षणपद्धती प्रचंड वादात आहे. त्यात प्रॅक्टिकल्स नाहीत, प्रोजेक्ट नाहीत, मैदानी खेळ -स्पर्धा नाहीत, कलागुणांना वाव देणारी वार्षिक स्नेहसंमेलने नाहीत यामुळे मुलांच्या शैक्षणिक आयुष्याबरोबरच उपजत कलागुणदेखील लोप पावत चालले आहेत. शिक्षण ही मुलांच्या आयुष्यातील पहिली व सर्वात महत्वाची पायरी मानली जाते. मुलांचे करिअर घडण्याच्या प्रक्रियेतील तो पाया आहे. मात्र मागील दोन महत्वाची वर्षे शिक्षणाविना वाया गेल्याने मुलांचे अतोनात व न भरून निघणारे नुकसान झाले आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुलांचे आरोग्य नक्कीच महत्वाचे आहे मात्र त्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे कमी पटसंख्येवर किंवा विद्यार्थ्यांची पटसंख्या विभागून कोरोनाचे नियम पाळून यंदा शाळा सुरू करण्याचा किमान प्रायोगिक प्रयत्न व्हायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment