मालिकेतून पोलिसांची बदनामी नको
- Get link
- X
- Other Apps
झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सत्य कथानकावर आधारित ही मालिका मूळ कथानकापासून भरकटत चालल्याचे वारंवार दिसून आले आहे. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेत अनेक प्रसंग, भाग अवास्तव व अवाजवी पद्धतीने घुसवलेले आहेत. एक बोगस डॉक्टर बिनबोभाटपणे अनेक खून करून ते पचवण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांना त्याचे पुरावे मिळूनदेखील आरोपी स्वतःची वकिली स्वतःच करत निर्दोष सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याला हातोहात फसवणारा हा देवमाणूस जेलमधील हवालदार व जेलरला देखील पैशांचे अमिष दाखवून आपली मदत करायला लावतो. यात पोलीस खात्याची नको तितकी बदनामी व कमजोरी दाखवण्यात आलेली आहे जी योग्य नाही. महाराष्ट्रातील पोलीस हे सतर्क व कर्तव्यतत्पर समजले जातात. मात्र सत्य घटनेवर आधारित ही मालिका मूळ कथेला भरकटवत राजरोसपणे पोलिसांचे काढत असलेले वाभाडे नक्कीच आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे पोलिसांना कमी लेखणाऱ्या या मालिकेला आता आवर घाला व खऱ्या घटनेत ज्याप्रमाणे बोगस व खुनी डॉक्टरला अटक होऊन शिक्षा झाली त्याचप्रमाणे कथेला विराम देऊन पोलिसांच्या तपास व चौकशीला योग्य न्याय मिळाल्याचे दाखवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment