रोज मरे त्याला कोण रडे

पावसाळ्यात मुंबईमध्ये काही ठराविक भागांत दरवर्षी पाणी तुंबते. पावसाचे पाणी खाडी, नाला, नदी वा समुद्रापर्यंत व्यवस्थितपणे वहन करणारी यंत्रणा शहरांतर्गत अस्तित्वात नसल्याकारणाने पाण्याचे नियोजन नीट होत नाही व अतिवृष्टीत सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते. अनेकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये, वाहनांमध्ये पाणी शिरते व मोठे आर्थिक नुकसान होते. डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेली अनेक घरे, झोपडपट्ट्या किती धोकादायक ठरत आहेत हे नुकत्याच मुंबई ठाण्यात इमारती कोसळण्याच्या व घरांवर दरड कोसळण्याच्या घडलेल्या घटनांनी स्पष्ट झाले आहे. यामुळेच ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, शीळफाटा या भागांतील सखल व डोंगरमाथ्याशी असलेल्या भागांत लोक जीव मुठीत घेवुन वास्तव्य करत आहेत. वास्तविक, ही शहरे मोठमोठ्या महानगरपालिकांच्या अखत्यारीत येत असून सुनियोजित मानली जातात. मात्र नियोजन व संनियंत्रणाचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे प्रचंड पेव आले व वस्त्याच्या वस्त्या अधिकृतरित्या शहरातील मोकळ्या व मोक्याच्या ठिकाणी उदयास आल्या. याला राजकीय पाठबळ देखील बऱ्याच अंशी जबाबदार आहे. यामुळे नागरी सुविधांचे मुख्यत्वे ड्रेनेज सिस्टमचे नियोजन करण्यात प्रचंड अडथळे निर्माण झाले व परिणामी पावसाच्या पाण्याला मोकळी वाट मिळत नसल्याने अशा अडथळ्यांच्या व सखल भागात पाणी साचणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरांतील सर्वच महानगरपालिकांनी मूसळधार पावसात पाणी भरणारी ठिकाणे हेरून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अस्ताव्यस्तपणे फोफावलेली बेकायदा बांधकामे निष्कसित करावीत, नव्या अनधिकृत बांधकामांना पायबंद घालावा, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी इमारतींचा पुनर्विकास होईस्तोवर पर्यायी व्यवस्था करावी. मात्र ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती दिसून येत नसल्याने लोकांची देखील अवस्था 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी झालेली आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त