ग्रामीण भागातील आरोग्यदूत "आशा"
- Get link
- X
- Other Apps
शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविकांची नियुक्ती खेडोपाडी करण्यात आलेली आहे. आशा ही स्वयंसेविका असुन ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये जागरुकता,सुसंवाद, समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करत आहे. गावपातळीवर स्थानिक ग्रामस्थांमधून व ग्रामसभेव्दारे आशाची निवड होत असल्यामुळे गावक-यांशी आरोग्य सुसंवाद साधणे व विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे यासाठी आशांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या काळात आशांनी आपली भूमिका अत्यंत चोखपणे बजावल्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आशांचे योगदान दुर्लक्षित करता येण्याजोगे निश्चीत नाही. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना अटकावासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरलेल्या शासनाच्या महात्वाकांक्षी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आशांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे ही मोहिम प्रचंड यशस्वी ठरली होती. यात घरोघरी जाऊन रुग्ण सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी आशांनी पार पाडली होती. तसेच पल्स पोलिओ, कुष्ठरोग व क्षयरोग नियंत्रण, आरोग्यवर्धिनी यासारखे निरनिराळे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमदेखील आशा ताईंच्या सहभागातुन राबविले जातात. राज्यातील कुपोषणग्रस्त भागांमध्ये माता व बालमृत्यू कमी करण्याचे प्रयत्नदेखील आशांच्या माध्यमातून केले जात आहेत. ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागातदेखील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत आशा कार्यकर्ती नेमल्या जात आहेत. राज्यभरात ग्रामीण भागांत एकूण ६१००० तर शहरी भागांत जवळपास १०००० आशा नेमण्यात आलेल्या आहेत. या आशांच्या माध्यमातुन आरोग्य विभागातील बहुतांश कार्यक्रम गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना व इतर आजारांच्या रुग्णशोध व निर्मूलन मोहिमेमध्ये आशांची भूमिका ही एकमेवाव्दितीय राहीली आहे. कोविड काळात आशांनी रुग्णांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यापासून त्यांना मानसिकआधार देण्याचेदेखील प्रयत्न केले. त्यामुळेच आशा आज ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा समजल्या जातात. आता तर वरिष्ठ पातळीवर आरोग्याचे विविध अहवाल सादर करण्याचे कामदेखील आशा करताना दिसत आहेत. यासाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या दृष्टीनेदेखील आशा हा आरोग्याचा एक महत्वाचा घटक असुन आशांच्या कामकाजाची दखल वेळोवेळी केंद्र शासनामार्फत घेतली जाते. येत्या काळात संभवणारी कोविडची तिसरी लाट प्रामुख्याने लहान मुलांमध्ये येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने ग्रामीण कुटुंबांमध्ये जनजागृती करण्यासाठी आशांची मोठी मदत होणार आहे. राज्याच्या कानाकोप-यात पसरलेले आशांचे जाळे आरोग्य व्यवस्थेचे एक प्रकारचे कवच असुन त्याचा गोरगरीब, गरजू लोकांना मोठया प्रमाणावर फायदा होत आहे. आशा ही प्रत्येक गावची, घराची हक्काची आरोग्यदूत असुन तिच्याव्दारे कोणत्याही आजारावर सहजसाध्य सरकारी उपचार मिळवणे आज शक्य झाले आहे. त्यामुळेच आशांचे स्थान व योगदान हे अतुलनीय असुन त्यांचा सन्मान व आदर राखण्याची जबाबदारी शासनाबरोबरच समाजातील सर्व घटकांची आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment